बहुप्रतिष्ठित अशा इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) बीसीसीआयकडून जोरदार तयारी सुरू आहे. नुकताच दुबईमध्ये मिनी लिलाव देखील पार पडला. आता बीसीसीआयकडून आयपीएल २०२४ साठीच्या टायटल स्पॉन्सरचा शोध सुरू आहे. अशातच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय चीनला टायटल स्पॉन्सरशिपसाठी बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने काढलेल्या टेंडरमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की, ज्या देशांचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत त्यांना या निविदेत महत्त्व दिले जाणार नाही. टायटल स्पॉन्सरशिपची मूळ किंमत प्रति वर्ष ३६० कोटी रुपये आहे, त्यानंतर बोलीच्या आधारे निविदा दिली जाईल. मात्र, बीसीसीआयने कोणत्याही देशाचा किंवा ब्रँडचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. बीसीसीआयचा हा निर्णय लोकांच्या प्रतिक्रिया आणि चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोच्या नकारात्मक अनुभवामुळे घेतल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी चिनी फोन कंपनी विवो ही आयपीएलची प्रायोजक होती, परंतु २०२० मध्ये भारत-चीन सीमेवर परिस्थिती बिघडली तेव्हा बीसीसीआयने विवोला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि टाटा एक वर्षासाठी टायटल स्पॉन्सर म्हणून आले.
बीसीसीआयने आयपीएलच्या २०२४- २०२८ या सीझनसाठी टायटल स्पॉन्सरबाबत टेंडर काढली आहे. त्यामुळे आता आगामी आयपीएलच्या सीझनपासून इंडियन प्रीमियर लीगला ‘टाटा आयपीएल’च्या ऐवजी दुसऱ्या नावाने ओळख मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या २०२४-२०२८ सीझनच्या टायटल स्पॉन्सर अधिकारांसाठी निविदा जारी करण्याबाबत माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात गुंतवणूक आली पण आदित्य ठाकरेंना नाही कळली !
जय श्रीराम: उत्तराखंडमधून १५०० रामभक्त येणार अयोध्येत!
आरबीआयसह ११ बँकांना उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल!
कटू आठवणी विसरून विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालाय सज्ज!
आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरसाठी टाटा ग्रुपसोबतचा करार हा २०२४ सीझनच्या शेवटपर्यंत वैध होता आणि बीसीसीआयने आता त्यासाठी नवी निविदा काढल्या आहेत. दरम्यान, टाटा पुन्हा टेंडर भरू शकतात आणि पुन्हा आपलं नाव आयपीएलचं टायटल स्पॉन्सर म्हणून निश्चित करू शकतात. जर असं झालं तर पुन्हा पुढच्या चार वर्षांच्या कालावधीसाठी आयपीएलला ‘टाटा आयपीएल’ म्हणूनचं संबोधलं जाईल.