वंदे भारत एक्स्प्रेसच्या बॅटरी बॉक्सला आग

मध्य प्रदेशमधील घटना

वंदे भारत एक्स्प्रेसच्या बॅटरी बॉक्सला आग

मध्य प्रदेश येथील कुरवई केथोरा रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझवल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

सोमवार, १७ जुलै रोजी सकाळी भोपाळ ते दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला अचानक आग लागली. या कोचमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरीला ही आग लागल्याची बाब समोर आली. मध्य प्रदेशमधील रानी कमलापती स्थानकातून ही ट्रेन दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाल्यानंतर काही वेळाने ही घटना घडली.

ट्रेन रवाना होत असतानाचं बॅटरी बॉक्सला आग लागल्याची बाब कुरवाई केथोरा स्थानकाजवळ निदर्शनास आली. त्यानंतर तातडीने ट्रेन थांबवून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. तातडीने ट्रेनमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून आग विझवण्यात आली.

“वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि ही आग आटोक्यात आणण्यात आली”, अशी माहिती रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातल्या विविध भागात अनेक वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे. देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या एक्स्प्रेसला होणाऱ्या अपघातांमुळेही वंदे भारत चर्चेत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांत प्राणी ट्रॅकवर आल्यामुळे झालेल्या अपघातात काही ट्रेनच्या पुढच्या भागाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं.  त्यानंतर ही घटना घडली आहे.

हे ही वाचा:

दुगारवाडी धबधब्यात १७ वर्षीय तरुण गेला वाहून

आयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक

आशियाई ऍथलीट्स चॅम्पियनशिपमध्ये पदकतालिकेत भारत तिसरा

असभ्य भाषेची राऊत यांना आता शरम वाटू लागली…

एप्रिल महिन्यात केलं होतं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात या मार्गावरील रेल्वे सेवेचं उद्घाटन केलं होतं. यामार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ७०१ किलोमीटरचं अंतर साडेसात तासांमध्ये पार करून रानी कमलापती स्थानकाहून हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहोचते.

Exit mobile version