बांगलादेशातील बिघडत चाललेली परिस्थिती पाहता, ‘हॉटेल असोसिएशन ऑफ मालदा’ने मोठा निर्णय घेतला आहे. हॉटेल असोसिएशनच्या निर्णयानुसार यापुढे आता बांगलादेशी नागरिकांना शहरातील कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी मिळणार नाही. हॉटेल असोसिएशन सदस्यांच्या ४ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मालदा हा पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर असलेला जिल्हा आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर सुरू असलेले अत्याचार आणि तिरंग्याचा कथित अपमान लक्षात घेऊन मालदा हॉटेल असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. हॉटेल असोसिएशनने जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनाही आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मालदा हॉटेल असोसिएशनचे सचिव कृष्णेंदू चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत बांगलादेशातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य होत नाही तोपर्यंत त्या देशातील कोणत्याही नागरिकाला मालदा येथील हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
कृष्णेंदू चौधरी यांनी सांगितले की, या निर्णयामागे दोन कारणे आहेत. पहिला, हा जिल्हा बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे बांगलादेशातील अशांततेनंतर तेथील बदमाश आणि दहशतवादी बनावट कागदपत्रे घेऊन भारतात घुसण्याची भीती आहे. जे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. अशा स्थितीत हॉटेल मालकांनाही पोलिसांकडून त्रास सहन करावा लागू शकतो.
चौधरी यांच्या मते, या निर्णयामागचे दुसरे कारण म्हणजे बांगलादेशातील विद्यार्थ्यांकडून तिरंग्याचा अपमान करण्यात आला. जे मान्य नाही. हे कोणत्याही देशाच्या सुजाण नागरिकाचे काम नाही. या निर्णयामुळे हॉटेल मालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, पण देश प्रथम येतो, असे चौधरी म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी कोलकात्याच्या जेएन रे हॉस्पिटलने कोणत्याही बांगलादेशी रुग्णावर उपचार न करण्याची घोषणा केली होती. बांगलादेशी नागरिकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे रुग्णालयाचे संचालक सुभ्रांशु भक्त यांनी सांगितले होते.
हे ही वाचा :
‘इंडी’च्या खासदारांनी अदानींविरोधातील केलेल्या आंदोलनात तृणमूल काँग्रेस गायब!
उत्तरप्रदेश सरकार मदरसा कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत
मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही!
कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी ‘महाकुंभ ग्राम’