श्रीकांत पटवर्धन
गेल्या वर्षभरामध्ये बांगला देशात हिंदू व इतर अल्पसंख्यांच्याविरुद्ध २२०० हिंसाचाराच्या घटना घडल्याची नोंद आहे. नोंद न होऊ शकलेल्या लहानमोठ्या घटना आणखीही असतील. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालय या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र बांगला देशातील अल्पसंख्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी तिथल्या सरकारची आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अलीकडेच ९ डिसेंबर २०२४ रोजी परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्री याबाबतीत बांगलादेशला अधिकृत भेट देऊन आले. त्यांनी याविषयी भारताला वाटणारी चिंता मोहम्मद युनुस यांच्या निदर्शनास आणली.
हे सगळे जरी ठीकच असले, तरीही एकूण अशा हल्ल्यांची संख्या आणि विशेषतः हिंदू मंदिरांवरील हल्ले, हिंदू उत्सवांच्या मंडपांवरील हल्ले, इस्कॉन (ISKCON) सारख्या साधू संन्याशांच्या संस्थेतील महंतांना अटक, आणि त्यांना देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न – हे सगळे विचारात घेता आपली ही प्रतिक्रिया अगदी अपुरी असल्याचे लक्षात येते.
खरेतर भारत – बांगलादेश यांमधील संबंध हे निव्वळ दोन राष्ट्रांमधील सुदृढ संबंधांपेक्षा कितीतरी अधिक आपुलकीचे, मित्रत्वाचे नव्हे, तर बंधुत्वाचे असणे अपेक्षित आहे. कारण मुळात त्या राष्ट्राचा जन्मच भारताच्या सक्रीय सहकार्यातून झालेला आहे. १९७१ च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून भारतीय सेनेने तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधून पाकिस्तानी लष्कराला सपशेल माघार घ्यायला भाग पाडले. यामुळेच बांगलादेश या स्वतंत्र (पाकिस्तानी जोखडातून मुक्त) राष्ट्राचा जन्म होऊ शकला.
पण असे असूनही हे संबंध पुढे मात्र फारसे चांगले राहिले नाहीत. काय आहेत याची कारणे ? साधारण १९७५ पासून हे संबंध बिघडण्यास सुरुवात झाली, याचे मुख्य कारण म्हणजे बांगलादेश इस्लामिक राष्ट्र परिषदेचा (O.I.C) सदस्य बनून इस्लामिक देशांच्या बाजूने झुकला. अर्थात यामध्ये भाषिक-वांशिक (बंगाली) अस्मितेपेक्षा “मुस्लीम” असण्याला अधिक महत्व दिले गेले. असे असूनही, विशेष म्हणजे ऐतिहासिक गंगा पाणी वाटप करार १९९६ मध्ये करण्यात आला. दहशतवादाला प्रतिबंध करण्यासाठी उभय देशांत धोरणात्मक सहकार्य राहिले, तसेच द्विपक्षीय व्यापाराच्या क्षेत्रात हे दोन देश दक्षिण आशियातील सर्वात मोठे भागीदार आहेत. २०११ मध्ये भारताने बांगलादेशात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ७५० मिलियन अमेरिकी डॉलर्स चे कर्ज मंजूर केले, तसेच २०१४ मध्ये आणखी १ बिलियन अमेरिकी डॉलर्स चे
अल्प व्याजदराचे कर्ज (Soft loan) त्याच हेतूसाठी मंजूर केले.
हे ही वाचा:
मंत्र्यांच्या कामाचा ३ महिन्यांनी आढावा, परफॉर्मन्स चांगला नसल्यास देणार डच्चू!
शहापुरात ज्वेलर्सबाहेर गोळीबार,कामगाराचा मृत्यू!
दिल्लीतील बांगलादेशी होणार हद्दपार
महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून २०१५ च्या बांगलादेश भेटी दरम्यान दोन देशांमध्ये विविध क्षेत्रातील २२ द्विपक्षीय करार करण्यात आले. यामध्ये, भारताकडून बांगलादेशाला दोन बिलियन अमेरिकी डॉलर्सचे कर्ज, तसेच पाच बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन देण्यात आले. यामध्ये विशेषतः उर्जा, विद्युत निर्मिती क्षेत्रातील करारांचा समावेश होता. २०१८ मध्ये उभय देशांच्या नेत्यांनी १३० की.मी. लांबीच्या “भारत बांगलादेश मैत्री पाईप लाईन” चे उद्घाटन केले, ज्यामध्ये बांगलादेशला चार लाख टन डीझेल पाईप लाईन द्वारे (अत्यंत स्वस्तात) पुरवले जाण्याची व्यवस्था होती. २०१७ च्या शेख हसीना यांच्या भारत भेटीनंतर या दोन देशांत लष्करी सहकार्याचे दोन महत्वाचे करार झाले. कोणत्याही शेजारी राष्ट्राबरोबर भारताने केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच करार होता. यामध्ये संयुक्त लष्करी कवायती, खास प्रशिक्षण, तांत्रिक आणि वाहतूक वितरण व्यवस्थेबाबत सहकार्य, लष्करी सामग्रीच्या उत्पादनासाठी केंद्रे उभारणे, बांगलादेशाला त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनवणे, इत्यादी बाबी आहेत. यामध्ये भारताने प्रथमच एका शेजारी देशाला संरक्षण दलाशी संबंधित असे ५०० मिलियन अमेरिकी डॉलर्स चे कर्ज संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी मंजूर केले.
या खेरीज, शिक्षणाच्या क्षेत्रात दरवर्षी २०० गुणवान बांगलादेशी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (ICCR च्या) शिष्यवृत्त्या (पदवी आणि पदव्युत्तर संशोधनासाठी) आयुर्वेद, युनानी व होमिओपथि या पारंपारिक शाखांमध्ये संशोधन /अध्ययन यासाठी दिल्या जातात. याउलट, ढाक्का येथील भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या माहिती नुसार सुमारे ४०० भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांनी २०१७ मध्ये चितगाव (बांगलादेश) येथे बांगलादेश वैद्यकीय / दंतवैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश न मिळू शकल्याने निषेधात्मक आंदोलन केले. आता आपण क्षणभर हे सर्व बाजूला ठेवू, आणि काही अगदी सामान्य माणसांना सध्या भाषेत कळतील, असे मुद्दे बघू.
अशा तऱ्हेचा पहिला मुद्दा हा, की बांगला देश, हा काही देश जसे Land locked देश असतात, तसा India
locked देश आहे ! अर्थात, तो सर्व बाजूंनी भारताने वेढलेला आहे. त्या देशाच्या एकूण ४३६७ कि.मी. सरहद्दी पैकी ९४ % सीमा भारताबरोबर आहे. ह्या भौगोलिक कारणामुळे, बांगलादेश हा सुरक्षा व व्यापार या बाबतीत भारतावर अवलंबून आहे. व्यापाराबाबत बोलायचे, तर बांगलादेश – गहू, तांदूळ, कांदे, लसूण, आले, साखर, कापूस, अन्नधान्ये, लोखंड, पोलाद, पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रोनिक सामग्री व प्लास्टिक – यांच्या पुरवठ्यासाठी भारतावर बराचसा अवलंबून आहे. मुख्यतः वस्त्रोद्योग हा तिथला मुख्य उद्योग असून, त्याला लागणारा कापूस मुख्यतः भारतच पुरवतो. अशाच तऱ्हेने, तेथील बहुतांश उद्योगांना लागणारा कच्चा माल भारतच पुरवतो. आणि विशेष म्हणजे, वर दिलेल्या भौगोलिक कारणांमुळे भारतच
त्याच्या सर्वाधिक जवळ असल्याने, अन्य कोणताही देश या वस्तू त्याला भारत ज्या दराने देऊ शकेल, त्या दराने देऊ शकत नाही. कारण अर्थातच वाहतूक खर्च. यामुळे, भारताशी संबंध कोणत्याही कारणाने बिघडणे, हे बांगलादेशाला कधीही परवडणार नाही.
उभय देशांच्या संबंधांमधील घसरण, ही लगेच – निर्यातीत घसरण, GDP मध्ये घसरण, अधिक महागाई, वाढती बेकारी – यामध्ये अपरिहार्यपणे परिवर्तित झालेली दिसेल. इतर देश (मुख्यतः पाकिस्तान व चीन) मित्र म्हणून कितीही आकर्षक वाटले, तरी भौगोलिक कारणांमुळे भारताशी मैत्री हीच बांगलादेशासाठी अधिक महत्वाची ठरेल. थोडक्यात असे म्हणता येईल, की १९७१ मध्ये भारताच्या सक्रीय मदतीनेच बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला. आता २०२४ मध्ये अलीकडच्या सत्तांतरानंतर सुद्धा बांगलादेशाला विकासाच्या मार्गावर पुढे जायचे असेल, तर त्यासाठी भारताशी चांगले संबंध निश्चितच आवश्यक आहेत. इथे हे लक्षात घ्यावे लागेल, की या दोन देशांतील संबंधांना आर्थिक, संरक्षणात्मक (लष्करी), पाणी वाटप, उर्जा / वीज, वाहतूक व्यवस्था, वगैरे बाबींइतकीच एक महत्वाची किनार आहे – जी आहे धार्मिक / सांस्कृतिक. तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सूची (NRC) याविषयी नाराजी दाखवूनही शेख हसीना यांनी हे मान्य केले होते, की हे भारताचे अंतर्गत प्रश्न आहेत. सध्याचे युनुस सरकार ह्या गोष्टी भारताच्या अंतर्गत मानायला तयार नाहीत. त्यांनी हे लक्षात घ्यावे लागेल, की तिथे होणारे हिंदुंवरील हल्ले – हिंदूंच्या उत्सव मंडपांवरील हल्ले, हिंदू साधू
संन्याशांवरील हल्ले – हे इथे भारतात बांगलादेशी (मुस्लीम) लोकांविरुद्ध जनमत तयार करतात, ज्यामुळे दोन देशाच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, ज्याचा जास्त फटका बांगलादेशाला च बसणार आहे. मागे मालदीव येथील नव्या सरकारला असेच अचानक चीनचे प्रेम उफाळून आले होते, “इंडिया बाहेर जा” (India out) – अशी मागणी जोर धरत होती. भारताच्या परराष्ट्र खात्याने थोडे “उद्बोधन” केल्यावर ते खूळ उतरले आणि मालदीवचे नवे अध्यक्ष मोहमद मुईझ्झू यांनी पुन्हा एकदा भारताशी सकारात्मक धोरण स्वीकारले आहे. बांगलादेश मालदीव पेक्षा कितीतरी जास्त पटीने भारतावर अवलंबून आहे.
त्यामुळे, बांगलादेशाने आता तिथल्या हिंदुंवर होणारे हल्ले तातडीने थांबवावेत. द्विपक्षीय संबंधांवर विपरित परिणाम होईपर्यंत गोष्टी ताणू नयेत. हिंदूंच्या (तिथल्या आणि भारतात ल्याही) संयमाचा अंत बघू नये. इथे जाता जाता सहजच एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते. ती अशी – भूतपूर्व काँग्रेसी पंतप्रधान मनमोहन सिंग – हे एकदा पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालापामध्ये म्हणाले होते, की “सुमारे २५% बांगलादेशी हे भारतविरोधी असतात.” आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाजपशी संबंध नसलेल्या, हिंदुत्वाचे प्रेम नसलेल्या, विद्वानाचे हे मत निश्चितच विचारणीय आहे.