भारतीय महिला गिर्यारोहक बलजीत कौर या अन्नपूर्णा शिखर गाठण्याच्या प्रयत्नात बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू होती. पण आता त्यांचा शोध लागला आहे. माऊंट अन्नपूर्णाच्या मोहिमेवर त्या होत्या त्या दरम्यान त्या बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिद्धीस आले. पण त्यांचा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोध घेण्यात आल्यावर त्या जिवंत असल्याचे स्पष्ट झाले.
जगातील १०व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर म्हणून अन्नपूर्णा ओळखले जाते. बलजित कौर यांनी ऑक्सिजनशिवाय हे शिखर सर करण्याचा संकल्प केला होता. पण चौथ्या कॅम्पच्या वर गेलेल्या असताना त्यांचा संपर्क तुटला होता. अशी माहिती पायोनियर ऍडव्हेन्चरचे पसांग शेर्पा यांनी दिली.
ते म्हणाले की, या कॅम्पवरून त्यांना खाली आणण्यासाठी आम्ही आता बचाव मोहीम आखत आहोत. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांचा शोध घेण्यात आला तेव्हा कॅम्प चारच्या वर त्या एकट्याच असल्याचे लक्षात आले. बलजित यांचा रेडिओ संपर्क तुटल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला आहे का किंवा नेमके काय झाले आहे हे कळायला मार्ग नव्हता. मात्र तशा बातम्या येऊ लागल्या होत्या. काही ठिकाणी त्यांच्या निधनाबद्दल दुःखही व्यक्त करण्यात आले. पण आता त्या सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी सकाळी बलजित यांनी रेडिओ लहरींच्या माध्यमातून आपल्याला मदतीची आवश्यकता असल्याचा संदेश पाठविल्यानंतर लागलीच हवाई मोहीम आखून त्यांचा शोध घेतला गेला. जेव्हा त्यांच्याकडून आलेले संदेश तपासण्यात आले तेव्हा त्या २४ हजार १९३ फुटांवर असल्याचे लक्षात येत होते. सोमवारी त्यांनी सायंकाळी ५.१५ वाजता दोन शेर्पांसह ही माऊंट अन्नपूर्णा मोहीम सुरू केली होती. पण नंतर त्यांचा ठावठिकाणा नव्हता. मग त्यांच्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स बचावासाठी पाठविण्यात आली.
हे ही वाचा:
लंडनच्या खलिस्तानी समर्थकांविरोधात एनआयए करणार चौकशी
अतिक अहमदची बेहिशोबी मालमत्ता, ११,६८४ करोडच्या घरात !
प्रशासनाने मनमानी करून कार्यक्रम केलेला नाही!
दरम्यान, अनुभवी गिर्यारोहक नोएल हॅना यांचा मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. १० वेळा एव्हरेस्ट सर करणाऱ्या या उत्तर आयर्लंडच्या गिर्यारोहकाचा कॅम्प चारवर दुर्दैवी मृत्यू झाला होता. शिखर सर केल्यानंतर कॅम्प चारला परतल्यावर त्यांचा मृत्यू झाला.
कॅम्प चारवरून खाली येत असताना ६ हजार फुटांवरून खाली कोसळलेले भारतीय गिर्यारोहक अनुराग मालू यांचा शोध अद्याप जारी आहे. त्यांचा शोध घेतला जात असला तरी त्यांचा मृतदेह सापडण्याची शक्यता अल्प असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.