महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खास भेटवस्तू दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना बाबरी ढाचाची वीट भेट म्हणून दिली आहे. नांदगावकर हे अयोध्येला कारसेवक म्हणून गेले होते. त्यावेळी पाडलेल्या मशिदीची वीट त्यांनी सोबत आणली होती. ३२ वर्षे त्यांनी ती वीट जपून ठेवली होती.
राम मंदिर बांधून झाल्यावर ती वीट हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी त्यावेळी केला होता. राम मंदिर बांधून झाले पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाळा नांदगावकर यांनी बाबरीची वीट भेट दिली.
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरीचा ढाचा पाडण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्रातून बाळा नांदगावकर गेले होते. तेव्हा त्या ढाचाजवळून एक वीट बाळा नांदगावकरांनी आपल्यासोबत आणली होती. त्यांनी एकूण दोन वीट आणल्या होत्या. एक त्यांच्याकडे असून ही एक वीट राज ठाकरे यांना दिली आहे.
हे ही वाचा:
ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग
लिव्ह इनची नोंदणी, हलाला, इद्दतवर बंदी….उत्तराखंड समान नागरी विधेयक सादर
औरंगजेबाने तोडले होते कृष्णजन्मभूमीतील मंदिर!
धर्मांतर रोखण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानात सनातन धर्म स्वीकारण्यासाठी व्यासपीठ
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “तो प्रसंग आठवला की, फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू येतात. राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब दिसतात. त्यावेळी काय सुचलं माहित नाही पण, मी बाबरीची वीट सोबत आणली होती. मी माजगावमध्ये कार्यालय बांधलं तेव्हा त्या कार्यालयाखाली वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधव यांच्याकडे आहे. पण ते ही माझे जुने सहकारी आहेत त्यामुळे हरकत नाही.”