बजरंग पुनिया आणि रवी दाहिया हे टोकियो ऑलिम्पिकमधील पदकविजेते कुस्तीगीर पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यातही अपयशी ठरले. त्यामुळे ते ऑलिम्पिकला मुकण्याची दाट शक्यता आहे. निवड चाचणीतील विजेते आशियाई आणि ऑलिम्पिक पात्रता चाचणीत सहभागी होतील. आशियाई चाचणी बिशेक येथे १९ ते २१ एप्रिलदरम्यान आहे, तर जागतिक चाचणी इस्तंबूलला ९ ते १२ मे दरम्यान होईल.
राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिक (२०२०) ब्राँझपदकविजेता बजरंग पुनिया याला रोहित कुमार याने ६५ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल श्रेणीत उपांत्य सामन्यात ९-१ असे पराभूत केले. आता अंतिम सामन्यात रोहितची लढत सुजीतशी होईल. तर, टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता रवी दाहिया यालाही पराभवाचा सामना करावा लागला. रवी याला ५७ किलो फ्रीस्टाइल श्रेणीत उदितने १०-८ने पराभूत केले. सराव सामने जिंकणाऱ्यालाच पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.
हे ही वाचा:
शाहजहान शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!
कुनो पार्कमधील ‘गामिनी चित्त्या’ने दिला पाच शावकांना जन्म!
बजरंग पुनियाला गेल्या वर्षी हांगझोऊ आशियाई गेम्सच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, ब्राँझ पदकाच्या लढतीतही बजरंगला जपानी कुस्तीगीराकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यांना यामागुचीकडून १०-० असा नामुष्कीचा पराभव सहन करावा लागला. त्यांच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला होता. कारण आशियाई गेम्सपूर्वी त्यांनी कोणत्याही स्पर्धांमध्ये भाग घेतला नव्हता. सराव सामन्यांत भाग न घेता त्यांना आशियाई स्पर्धांमध्ये खेळण्यास मुभा दिली गेल्यामुळे टीका झाली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धच्या आंदोलनात पुनिया याने सक्रिय सहभाग घेतला होता.