कर्तव्यपथावर बजरंगने ‘पद्मश्री’चा केला त्याग

पदक परत घेणार नसल्याचे केले जाहीर

कर्तव्यपथावर बजरंगने ‘पद्मश्री’चा केला त्याग

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची नियुक्ती झाल्याने संतापलेला ऑलिम्पिक पदकविजेता बजरंग पुनिया याने कर्तव्य पथावरील पदपथावरच त्याला मिळालेल्या पद्मश्रीचा त्याग केला. हे पदक परत देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेण्याकरिता निघालेल्या बजरंगला पोलिसांनी रोखल्याने त्याने कर्तव्य पथावरील पदपथावर हे पदक सोडले. तसेच, त्याने हे पदक परत घेणार नसल्याचे जाहीर केले.

‘मी आधीही सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या मुली आणि बहिणींसाठी लढत होतो. मी त्यांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही. त्यामुळे मी या सन्मानाला पात्र नाही. मी माझा पुरस्कार परत करण्यासाठी आलो आहे. माझ्याकडे पंतप्रधानांची अपॉइंटमेंट नसल्यामुळे मी त्यांची भेट घेऊ शकलो नाही. पंतप्रधानांचे खूप व्यग्र वेळापत्रक होते. त्यामुळे पंतप्रधानांना पत्र लिहून मी माझे पुरस्कार परत करत आहे. मी माझे पदक परत घेऊन जाणार नाही,’ असे पुनिया याने स्पष्ट केले.

संजय सिंह यांनी कॉमनवेल्थ गेम्सची माजी सुवर्णपदक विजेती अनिता शेओरन हिचा ४० विरुद्ध सात मतांनी पराभव करून कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद पटकावले. त्यानंतर साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

‘आम्ही मनापासून लढलो. मात्र बृजभूषणसारख्या माणसाचा, त्याचा व्यावसायिक भागीदार आणि निकटवर्तीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून येत असेल तर मी कुस्ती सोडत आहे. आजपासून तुम्ही मला मॅटवर कधीच पाहणार नाहीत,’ असे साक्षी मलिकने यावेळी जाहीर केले होते. हे सांगताना साक्षी मलिकचा अश्रूंचा बांध फुटला होता.

हे ही वाचा:

ब्रिटिशकालिन कायदे बदलले हा ऐतिहासिक क्षण!

डॉ. बालाजी आसेगावकर यांना केशवसृष्टी पुरस्कार

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदच्या जागेचा लिलाव!

“शरणागती पत्करा अथवा मरणाला सामोरे जा”, नेतन्याहूंचा हमासला इशारा!

देशभरातील काही कुस्तीगीरांनी कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण करत त्यांच्या कारवाईसाठी पाच महिने आंदोलन केले होते.

Exit mobile version