कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर आणि भाविकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांत अंतर्गत बजरंग दलाने आवाज उठवला आहे. खलिस्तानवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून उद्या बुधवारी (६ नोव्हेंबर) कॅनडाच्या दूतावासासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
ब्रॅम्प्टन शहरातील हिंदू सभा मंदिरात काल (४ नोव्हेंबर) दिवाळी साजरी करण्यासाठी जमलेल्या भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी खलिस्तानींना रोखण्याऐवजी पीडित हिंदूंवर लाठीमार करत त्यांना अटकही केली. विशेष म्हणजे, हिंदू मंदिरावर हल्ला झाला तिथे एक पोलिसच खलिस्तानी मोर्चात सामील झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर संपूर्ण भारतातून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कोकण प्रांत अंतर्गत बजरंग दलाने याचा निषेध करत उद्या आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. बजरंग दलच्या आंदोलनाचा आवाज कॅनडाच्या दूतावासाच्या माध्यमातून कॅनडा सरकारच्या कानावर पडावा, यासाठी बुधवारी (६ नोव्हेंबर) मुंबईतील प्रभादेवी येथील कॅनडाच्या दूतावासासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. ‘कॅनडातील हिंदू मंदिरांवर खलिस्तानी दहशतवादी हल्ल्याचा निषेध…’ अशी या निदर्शनाची थीम आहे. यासोबतच हिंदू समाजालाही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बजरंग दलाकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
‘औरंगजेबाने देशाला लुटले आणि मंत्री आलमगीरने झारखंडला लुटले’
२०३६ चे ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स भारतात होणार?
सलमान खानला धमकी देऊन पाच कोटींची मागणी करणाऱ्याला कर्नाटकातून अटक
‘संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक’
याबाबत विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी न्यूज डंकाशी बोलताना म्हटले की, कॅनडातील हिंदू मंदिरे आणि भाविकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटना तेथील सरकार, विशेषतः पंतप्रधान ट्रुडो यांच्या खलिस्तानींच्या तुष्टीकरणामुळे घडल्या आहेत. “आपले राजकारण टिकवण्यासाठी पंतप्रधान ट्रुडो खलिस्तानींची दाढी कुरवाळत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या मंदिरात भाविकांवर हल्ले होत असताना पोलीस मूक प्रेक्षक होते. हल्ल्यात जखमी झालेले भाविक धर्माने हिंदू असले तरी ते कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांचे संरक्षण करणे कॅनडा सरकारचे कर्तव्य आहे. अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी यावेळी केली.