धक्कादायक! घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर महिन्याभरात ४० अपघात

धक्कादायक! घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर महिन्याभरात ४० अपघात

अवघ्या महिन्याभरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाने पालिकेचे पितळ उघडे पडले आहे.

नुकत्याच झालेल्या बाईकस्वाराच्या अपघातानंतर उड्डाणपूलावरील एक मार्गिका आता बंद करण्यात आलेली आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील या उड्डाणपूलाचे काम पाच वर्ष रखडले होते. या उड्डाणपुलाचा बांधकाम खर्चही जवळपास दुप्पट झाला आहे. ७०० कोटीहून अधिक खर्च उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी खर्च केले आहेत. मात्र, या उड्डाणपुलाचे पुन्हा भूपृष्ठीकरण (सरफेसिंग) न झाल्यामुळं एका तरुणाला जीव गमावावा लागला आहे. महिन्याभरात एक नाही तर तब्बल ४० अपघात झाल्यामुळे अखेर उड्डाणपूलावरील एक मार्गिका बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे. तसेच उड्डाणपुलावरून जात असलेल्या विद्युततारांमुळेही अपघातांची धास्ती आहेच. अशा व इतर कारणांमुळे पुलाची एक मार्गिक अवघ्या महिन्याभरात बंद करण्यात येण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील (घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड) उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२१ रोजी झाले. उड्डाणपूल मानखुर्द परिवहन विभागाच्या समन्वयाने सुरुवातीला 3 मीटर उंचीपर्यंत हलक्‍या वाहनांसाठी खुला करण्यात आला. परंतु महिन्याभरातच उड्डाणपूलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे हे समोर आलेले आहे. नुकत्याच झालेल्या एका अपघातामुळे पालिकेची झोप आता चांगलीच उडालेली आहे. त्यामुळेच सुरक्षेचे कारण देऊन आता एक मार्गिका बंद करण्यात आलेली आहे. नवीन उड्डाणपुलावर वाहनांच्या वेगावर मर्यादा लावण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक ५०० मीटरवर स्पीड ब्रेकर बसवले जातील, असे आता पालिकेने म्हटले आहे. अनेक वाहने पुलावर घसरत असल्यामुळे आता, त्याकरता मॅस्टिक डांबर बसवले जाईल असे पालिकेने म्हटले आहे.

हे ही वाचा:

आता देवालाच मैदानात उतरावे लागेल!

‘दलाल’ व्हायरसचा बळी

जीएसटी संकलनाची कोटी कोटीची झेप!

कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय जाणार नाय…भाजपाचा एल्गार

घाटकोपर – मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाण पुलावर दुचाकी घसरल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. त्याला सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता, दुर्लक्ष व निष्काळजीपणा जबाबदार असून दुर्दैवी तरुणाचा बळी गेल्यानंतर महापालिकेला उड्डाणपुलाच्या दुरुस्तीबाबत जाग आल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीत केली. सविस्तर लेखी उत्तर मिळेपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला.

गेल्या महिन्यात मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पुलाच्या दर्जाबाबत भारतीय जनता पक्षाकडून महापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांना पत्र लिहून देखील त्याबाबत अक्षम्य दुर्लक्षच करण्यात आले आहे. उड्डाणपुलावर रस्ता असमतोल असून त्याच्या दर्जाबाबत सुधारणा करण्याच्या सूचनाही करण्यात आली होती. मात्र, बेजबाबदार प्रशासनाच्या कानापर्यंत या सूचना पोहोचल्याच नाहीत. त्याची परिणीती म्हणून एका दुर्दैवी तरुणाचा बळी गेला. गेली पाच वर्षे उड्डाणपुलाचे काम रखडले होते. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतरही हा उड्डाणपूल केवळ हलक्‍या वाहनांसाठी सुरु केला आणि अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर प्रवेश दिला नाही. हा पूल अवजड वाहनांचा भार घेण्यास अद्याप सक्षम झालेला नसताना उद्घाटनाची घाई कशासाठी ? असा सवालही गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला.

Exit mobile version