भारताच्या महत्त्वाकांक्षी अशा सौर मोहिमेंतर्गत आदित्य एल-१ने यशस्वीपणे पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत झेप घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने( इस्रो) याबाबतची माहिती दिली. या मोहिमेवर मॉरिशस, बेंगळुरू आणि इस्रोच्या पोर्ट ब्लेअरस्थित केंद्रातून लक्ष ठेवले जात आहे. सध्या आदित्य एल-१ यान पृथ्वीपासून किमान २९६ किमी तर कमाल ७१ हजार ७६७ किमी अंतरावर फिरत आहे.
याआधी आदित्य एल-१ने ३ सप्टेंबर रोजी यशस्वीपणे कक्षा बदलली होती. तर, ५ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा कक्षा बदलली होती. तर, १५ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता यानाची चौथ्यांदा कक्षा बदलली जाणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य-एल १ हे १६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. या दरम्यान यानाची कक्षा बदलण्यासाठी पाचव्यांदा ‘अर्थ बाऊंड फायर’ केले जाईल.
हे ही वाचा:
शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे
पोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद
‘आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही’
ऋषी सुनक यांची पत्नीसह अक्षरधाम मंदिराला भेट !
इस्रोने २ सप्टेंबर रोजी भारताच्या पहिली सौर मोहिमेंतर्गत आदित्य एल १ यान प्रक्षेपित केले होते. इस्रोने पीएसएलव्ही सी ५७ लाँच व्हेइकलने आदित्य एल-१ला यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते. हे यान चांद्रयान-३सारखे सर्वांत प्रथम पृथ्वीची परिक्रमा करेल आणि नंतर वेगाने सूर्याच्या दिशेने झेप घेईल.
आदित्य एल-१ अंतराळ यान सूर्याचा सर्वांत बाह्य स्तर करोनाचा अभ्यास करणार आहे. सूर्य हा पृथ्वीपासून सर्वांत जवळचा तारा आहे. सूर्याच्या अभ्यासामुळे आपल्याला ताऱ्यांबाबत अधिक माहिती कळू शकणार आहे. यातून मिळालेल्या माहितीने आपल्याला दुसरे तारे, आकाशगंगा आणि खगोल विज्ञानाचे रहस्य समजण्यास मदत मिळणार आहे. पृथ्वीपासून सूर्य सुमारे १५ कोटी किमी दूर आहे.