पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १०७ व्या भागात देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे विविध विषयांना हात घातला. विवाहसोहळे भारतात आयोजित करा,परदेशात कशाला असा सवाल उपस्थित करत भारतात त्यातून उलाढाल होईल, रोजगार उपलब्ध होईल, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
परदेशात लग्न करण्यावर पंतप्रधानांनी प्रश्न उपस्थित केला. मोदी म्हणाले, आजकाल काही कुटुंबं परदेशात जाऊन लग्न करू लागली आहेत. त्यामुळे नवीन वातावरण तयार होत आहे. ते आवश्यक आहे का? जर आपण भारतीय भूमीवर, भारतातील लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील. भारतातील लोकांना यानिमित्ताने काम मिळेल, रोजगार मिळेल. तुम्ही व्होकल फॉर लोकलचा विचार करणार का, परदेशाऐवजी भारतातच लग्नसोहळे आयोजित करणार का?
पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या मागील १०६ व्या भागात ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमेवर भर दिला होता.त्याबाबत पंतप्रधान म्हणाले होते की, प्रत्येक वेळेप्रमाणेच याही वेळी सणासुदीच्या वेळी ‘वोकल फॉर लोकल’ हे आपलं प्राधान्य असायला हवं. दिवाळी आणि इतर सणांमध्ये स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. जेणेकरून या कारागिरांना रोजगार मिळू शकेल आणि त्यांच्या पारंपरिक कलेशी संबंधित व्यवसायही भरभराटीला येतील. त्यामुळे या कारागिरांच्या घरातही आनंदाचे वातावरण राहील. मोदींनी दिवाळीत फक्त मेड इन इंडियाच्याच वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानुसार मोदी म्हणाले, “देशात खादी उत्पादनांची विक्री ३० हजार कोटींपेक्षा कमी होती, ती आता १.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांवर ४ लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे.आता तर घरातील मुलेही दुकानात काही खरेदी करताना त्यावर मेड इन इंडिया लिहिलेले आहे की नाही हे तपासू लागले आहेत.हे ‘व्होकल फॉर लोकल’चं यश असल्याचं मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
आयपीएलच्या कोलकाता संघातून शार्दुल ठाकूर बाहेर!
दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली, १४ थायलंडचे नागरिक रेड क्रॉसला सुपूर्द!
मराठी पाट्या न लावल्यानं मनसे आक्रमक,ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासलं काळं!
दगडफेकीच्या घटनेबाबत नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा!
मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली
पंतप्रधान मोदींनी रविवारी २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी २६/११ च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. २६ नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, या दिवशी देशावर सर्वात भयंकर हल्ला झाला होता, असं ते म्हणाले. तसेच ‘मन की बात’मध्ये छायाचित्रकार राहुलच्या कामगिरीचा गौरव देखील पंतप्रधान मोदींनी केला.
पंतप्रधान मोदींनी सुरवातीलाच हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली.पंतप्रधान मोदी म्हणाले, “२६ नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी देशात सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडला होता. पण त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता पूर्ण धैर्याने दहशतवादाचा पाडाव केला, ही भारताची ताकद आहे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांना आज देश आठवत आहे, पंतप्रधान मोदी म्हणाले.तसेच मोदींनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.मोदी म्हणाले, “२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारताचं संविधान स्वीकारलं होतं. मी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मन की बातमध्ये पंढरपूरच्या छायाचित्रकाराचा गौरव केला.नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथील अमृत उद्यानात मेळाव्यांच्या प्रदर्शनात आषाढी यात्रा , हुलजंती येथील यात्रा आणि म्हसवड यात्रेतील आपले फोटो देणाऱ्या विठ्ठल मंदिराचा छायाचित्रकार राहुल गोडसे यांचे फोटो दाखवत मोदी यांनी गौरव केला.देशातील सर्व सण , उत्सव , यात्रा , जत्रा हा या प्रदर्शनाचा विषय होता. यासाठी देशभरातून जवळपास ११ हजार छायाचित्रकारांनी आपले फोटो पाठवले होते.यामध्ये पुरस्कार प्राप्त ६० छायाचित्रे आणि ज्युरी सदस्यांनी टिपलेली २२ सर्वोत्तम छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.यामध्ये पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे छायाचित्रकार राहुल गोडसे यांच्या तीन फोटोंची निवड करण्यात आली होती.सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते ऑक्टोबर २०२२ मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. ही स्पर्धा १ ऑक्टोबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
तसेच पंतप्रधान मोदींनी लडाखच्या पश्मिना शालचा देखील उल्लेख केला.भारतात पेटंट अर्ज वाढले असल्याचंही मोदी म्हणाले. बुद्धिमत्ता, कल्पना आणि नाविन्य ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे. २०२२ मध्ये भारतातील पेटंट अर्जांमध्ये ३१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, त्याबद्दल मोदींनी तरुणांचं अभिनंदन केलं आहे.