उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष व महिला सतेज करंडक कबड्डी स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी पुरुषांमध्ये बाबुराव चांदेरे फौंडेशन संघाने एनटीपीएस संघावर ४६- ३४ गुणांनी विजय मिळवित सतेज करंडकावर शिक्कामोर्तब केले.तर महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकाविले.
पुरुषांच्या गटात अंतिम फेरीत मध्यंतराला चांदेरे फौडेशन संघाकडे २३-१६ अशी आघाडी होती. चांदेरे फौडेशनच्या अजित चव्हाण याने आक्रमक खेळ करीत चढाईत १० गुण मिळविले, राम अडागळे याने पकडीत ७ गुण मिळविले, सुनिल दुबिले याने चढाईत ७ गुण मिळविले, अक्षय सुर्यवंशी चढाईत ६ गुण, ऋषिकेश भोजने पकडीत ५ गुण मिळविले. नंदुरबारच्या तेजस काळभोर चढाईत १२ गुण, ऋषिकेश बनकर याने चढाईत ५ गुण मिळविले. श्रेयस उंबरदंड पकडीत ३ गुण मिळविले. ओंकार गाडे विवेक राजगुरू प्रशांत नागरे यांनी प्रत्येकी पकडीत २ गुण मिळविले.
हे ही वाचा:
महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या शिवशक्ती संघावर २७-१९ गुणांनी विजय मिळवित सतेज करंडकावर आपले नाव कोरले. मध्यंतराला दोन्ही संघाचा गुण फलक ८-८ असा समान गुणांवर होता. राजमाता जिजाऊ संघाच्या सलोनी गजमल व अंकिता जगताप यांनी अत्यंत सावध खेळ करीत आपल्या नावाला साजेसा खेळ करीत शिवशक्ती संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले.
राजमाता जिजाऊ संघाच्या सलोनी गजमल व अंकिता जगताप यांनी शिवशक्तीचा बचाव भेदत शेवटपर्यंत त्यांचा जम बसू दिलाच नाही. मद्यंतरापर्यंत दोन्ही संघानी सावध खेळ केला होता. राजमातााच्या सलोनी गजमल हिने आक्रमक चढाई करीत ९ गुण मिळविले. तर अंकिता जगताप हिने चढाईत अष्टपैलू खेळ करीत चढाईत ४ गुण व ५ पकडी करीत ९ गुण मिळविले. कोमल आवळे हिने २ पकडी केल्या.
शिवशक्तीच्या पूजा यादव चढाईत ८ गुण व एक पकड करीत ९ गुण मिळविले व सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. तर रिया मांडकईकर ४ गुण मिळवित तीला साथ दिली. मात्र त्यांना बचाब पटूंची साथ मिळाली नसल्याने या दोघींचे प्रयत्न अपुरे ठरले त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
इनामे
विजेते
पुरुष : बाबुराव चांदेरे फौडेशन नांदेड, अडीच लाख
महिला : राजमाता जिजाऊ, पुणे, अडीच लाख
उपविजेते
पुरुष : एनटीपीएस, नंदुरबार दीड लाख व चषक
महिला : शिवशक्ती मुंबई शहर दीड लाख व चषक
पुरुष : तृतीय क्रमांक- भैरवानाथ संघ पुणे, एक लाख व चषक
महिला : तृतीय क्रमांक -महात्मा गांधी मुंबई उपनगर एक लाख व चषक
चतुर्थ क्रमांक- पुरुष : वाघजाई रत्नागिरी एक लाख
महिला : महेशदादा स्पोर्टस् फौडेशन एक लाख