दादर हे फेरीवाले आणि शेअर टॅक्सीवाले यांना आंदणच दिल्यासारखे आहे. दादर स्थानकात पोहोचणे प्रवाशांना कटकटीचे बनले आहे. दादर हे पश्चिम आणि मध्य रेल्वेचे प्रमुख स्थानक. नेहमीच य़ा स्थानकावर वर्दळ असते. दादरमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. दादर ही मोठी बाजारपेठ असल्याने अनेक ग्राहकांची इथे झुंबड पाहायला मिळते. फेरीवाल्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपले बस्तान मांडले असून त्याजोडीला शेअर टॅक्सीवाल्यांची दादागिरी इथे पाहायला मिळत आहे. शेअर टॅक्सीसाठी लागणारी रांग ही आता दाटीवाटी असलेल्या रस्त्याच्या मधोमध लावण्यास सुरुवात केली आहे. ही रांग कबुतर खाना येथून सुरू होऊन आतील रस्त्याच्या आरपार गेलेली दिसते. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासही जागा नसल्याने ते त्रस्त झाले आहेत.
दादर स्टेशनला वरळी गाव येथून बीएसटीची A११८ नंबरची बस प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली आहे. परंतु ही बस कबुतरखाना येथून दादर स्थानकाबाहेर चालवताना चालकाला कसरत करावी लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजू फेरीवाल्यांनी व्यापल्यात. शेअर टॅक्सी उभ्या केलेल्या असतात. या शेअर टॅक्सी पकडण्यासाठी प्रवासी रस्त्याच्या मधोमध रांगा लावून रस्ताच व्यापून टाकतात. त्यात भर म्हणजे फूटपाथवर जागा नसल्याने पादचारी रस्त्याच्या मधोमध चालत असतात. एखाद्या बस चालकाने याविरोधात आवाज उठवल्यास आमच्यावर दादागिरीही करण्यात येते, असे एका चालकाने सांगितले.
ही बस प्रवासी भरल्यानंतर दादरहून वरळी गावाला जाताना तिला फिरवायलाही जागा नसते. या ठिकाणीही कामत हॉटेल शेजारीही शेअर टॅक्सीने आपले बस्तान मांडले आहे. येथेही लांबलचक रांगा रस्त्यातच लागलेल्या असतात. त्यामुळे चालकाला दररोज आरटीओची टेस्ट दिल्यागत कामत दुकानाच्या समोर गाडी घेऊन मागे घ्यावी लागत आहे. ही बस मागे घेताना तेथील टिसी आणि कंडक्टरच्या साहाय्याने बसवर थापा मारत कसरत करून घ्यावी लागत आहे. बस ज्या ठिकाणाहून फिरवण्यात येथे तेथेही हे फेरीवाले बसलेले असतात. जर एखाद दिवशी बस मागे घेताना जर अपघात घडला, तर याला जबाबदर कोण धरणार, अशी विचारणा होऊ लागली आहे.
हेही वाचा :
विद्वत्ता, निर्भयतेचे महामेरू भगवान महावीर
ममता वापरणार योगी आदित्यनाथांचा फॉर्म्युला
कुनो अभयारण्यातील बछड्यांचे होणार आहे बारसे… चला नावे सुचवा!
विराट कोहलीप्रमाणे ऋतुराज गायकवाडही डोळ्यांना सुखावतो!
विशेषतः सणासुदीच्या दिवशी तर ही परिस्थिती अधिकच चिघळलेली असते. तेव्हा तर फेरीवाल्यांसाठी बसच बंद केली जाते. ती कबुतरखान्यापर्यंतच सोडली जाते. आतमध्ये आणण्यास मनाई असते. म्हणजे स्टेशनवरून आलेल्या लोकांनी बससाठी तंगडतोड करत कबुतरखान्यापर्यंत यायचे अशी बेस्टची इच्छा असावी. या सगळ्या चक्रातून सर्वसामान्यांची कोण सुटका करणार असा सवाल उपस्थित होत आहे.