पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा केवळ शिवरायांच्या इतिहासाचाच गाढा अभ्यास होता असे नाही तर, त्याव्यतिरिक्त त्यांना जुनी नाणी, सह्याद्रीत आढळणारे विविध प्रकारचे दगड, विविध प्रकारची शस्त्रे, मंदिरे, मंदिरातील देवी- देवतांच्या मूर्ती याविषयीही सखोल ज्ञान होते. बाबासाहेब हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते, असे मत शस्त्रसंग्राहक निलेश सकट यांनी दादरमधील बाबासाहेब पुरंदरे यांच्या शोकसभेत व्यक्त केले.
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १५ नोव्हेंबरला १००व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) दादर येथील मादाम कामा सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती आणि दुर्गराज रायगड तर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या तसबिरीसह त्यांनी लिहिलेली पुस्तके, कादंबऱ्या, शस्त्र संग्रहक निलेश सकट यांना बाबासाहेब यांनी भेट म्हणून दिलेले जॅकेट आणि एका चित्रकाराने रेखाटलेले बाबासाहेब पुरांदारेंचे चित्र ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा:
नागपूरमधून ८४ लाखांची रोकड जप्त
जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?
गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
या शोकसभेला नाणीसंग्राहक प्रशांत ठोसर, शस्त्रसंग्राहक सुनिल पवार, निलेश सकट, जाणता राजा कलाकार समूह ठाणेचे व्यवस्थापक मिलिंद गोरे, छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक केळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब, श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या सहवासात अनुभवलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला. शोकसभेला बाबासाहेबांवर प्रेम करणारे इतिहास प्रेमी चंदन विचारे, दुर्गप्रेमी आणि विविध भागातील इतिहासप्रेमींनीही उपस्थिती दर्शवली होती.
मिलिंद गोरे यांनी जाणता राजा महानाट्याच्या तालमी आणि प्रयोगादरम्यान आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले. नाणीसंग्राहक अशोकसिंह ठाकूर यांनी त्यांना बाबासाहेबांनी ४० वर्ष जपलेले दुर्मिळ नाणे भेट दिल्याचा व्हिडिओ दाखवला.
आप्पा परब आणि भिडे गुरुजी यांनी बाबासाहेबांचे कार्य, महती भविष्यात आताच्या पिढीनेच पुढे न्यायचे आहे, असा संदेश दिला. श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समितीचे प्रमुख सुनिल पवार यांनी भविष्यात तरुणांनी इतिहास अभ्यासातून जास्तीत जास्त प्रकट होत शिवशाहीरांचे कार्य पुढे न्यावे, असे आवाहन केले. सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणी सांगत शोकसभेची सांगता केली.