राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणातील एका आरोपीने काल (१४ ऑक्टोबर) किला कोर्टात अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. आता तो हाडांच्या अस्थिकरण चाचणीतून प्रौढ असल्याचे निष्पन्न झाले आहे. किला कोर्टाच्या आदेशानंतर ही चाचणी घेण्यात आली होती.
बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग असे आरोपींची नावे आहेत. या दोघांना काल कोर्टात हजर केले असता आरोपी कश्यपने तो १७ वर्षांचा असल्याचा दावा केला.
कश्यपने अल्पवयीन असल्याचा दावा केल्याची माहिती आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला दिली तेव्हा आरोपीचे आधारकार्ड कोर्टात हजर केले गेले, त्यावर तो २१ वर्षाचा असल्याचे दिसून आले. मात्र, आरोपीचे कार्डवरील नाव वेगळे होते आणि त्याचे वय पडताळण्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला नव्हता.
त्यानंतर मॅजिस्ट्रेट कोर्टाने हाडांच्या ओसीफिकेशन चाचणीचे आदेश दिले. या चाचणीद्वारे शरीरातील विशिष्ट हाडांच्या क्ष-किरणांची तपासणी करून व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावला जातो. चाचणीनंतर आरोपी धर्मराज कश्यप प्रौढ असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आता आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे, ज्यानंतर कोर्ट त्याला पोलीस कोठडी सुनावेल.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशमध्ये दुर्गा मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत हिंसाचार; एकाचा मृत्यू
महायुती सरकारचा मोठा निर्णय; मुंबईकर झाले ‘टोल’मुक्त!
ट्रम्प यांच्या कॅलिफोर्नियाच्या कोचेलामधील रॅलीजवळून सशस्त्र व्यक्तीला अटक
हिजबुल्लाकडून इस्रायलच्या लष्करी तळावर हल्ला; चार जवान ठार
दरम्यान, मुंबई पोलिसांनी पुण्यातून तिसऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. प्रवीण लोणकर असे त्याचे नाव आहे, प्रवीण लोणकर हा शुभम लोणकरचा भाऊ आहे. शुभम लोणकर याने सोशल मिडीयावर पोस्ट टाकून बाबा सिद्दिकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील आरोपी शिवकुमार उर्फ शिवा गौतम अद्याप फरार आहे. तसेच या प्रकरणात आरोपी मोहम्मद झीशान अख्तर याचे नावे समोर आले असून पोलीस शोध घेत आहेत.