अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे. हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी सर्व रामभक्तांची इच्छा आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी भाविकांकडून देणग्यांचा ओघ सुरु झाला असल्याचे बघायला मिळत आहे. रामजन्मभूमीवर येणारे भाविक मोठ्या प्रमाणात रोख दान करत आहेत. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या रोख देणगीत जानेवारीपासून तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे.अवघ्या १५ दिवसांमध्ये एक कोटी रुपयांच्या देणग्या आल्या असल्याचे दिसून आले आहे.
दानपेटीतून एकावेळी काढण्यात येणारी रक्कम मोजण्यासाठी आता १५ दिवस लागत आहेत. अवघ्या १५ दिवसांत देणगीची रक्कम एक कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या कार्यालयाने म्हटले आहे. राम मंदिराची दानपेटी दर १० दिवसांनी उघडली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाने आता राम मंदिराच्या दानपेटीत द्यायची रक्कम मोजण्यासाठी आणि ट्रस्टच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे अधिकारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.
राम मंदिरासाठी येणाऱ्या देणग्यामध्ये झपाट्याने वाढत आहेत. नजीकच्या काळात आता तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर व्यवस्था करावी लागेल. तिरुपती बालाजी मंदिरातील शेकडो कर्मचारी दररोज देणगी स्वरूपात येणारी रक्कम मोजतात असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.
हेही वाचा :
सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!
ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून
नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर
दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू
मंदिराच्या गर्भगृहाचे खांब १४ फुटांपर्यंत तयार आहेत. मंदिर उभारणीचा पहिला टप्पा ऑगस् पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. . मंदिराचा दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होईल, तर २०२५ पर्यंत मंदिर पूर्ण आकार घेईल. सामान्य भाविकांसाठी जानेवारी २०२४ मध्ये मंदिरात दर्शन-पूजा सुरू होण्याची अपेक्षा आहे.मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत सुमारे ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मंदिरावर एकूण १,८०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात येत आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भाविक या मार्गावर प्रदक्षिणा घालतील.