अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास उद्घाटन सोहळ्याच्या एक आठवडाआधीच म्हणजे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन कसून कामाला लागले आहे.
अयोध्या या जंक्शनची वास्तूरचना श्री रामजन्मभूमी मंदिराच्या वास्तूवरून बेतली आहे. या स्थानकात दररोज सुमारे ५० हजार प्रवासी येतील, अशा अंदाजाने या स्थानकाचा विकास केला जात आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी या कायापालट झालेल्या स्थानकाचेही मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
या संपूर्ण रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी तब्बल २४१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हे अत्याधुनिक स्थानक विविध प्रवासीसुविधांनी युक्त असेलच, शिवाय या स्थानकात शॉपिंग मॉल, कॅफेटेरिया, अन्य विरंगुळ्याची साधने आणि पार्किंगची जागाही असेल. स्थानकाची इमारत दोन मजली असून त्याचा शेवटचा मजला तीन हजार ६४५ चौरस मीटर असेल. पदपथही चांगले केले जाणार असून सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल असतील.
हे ही वाचा..
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
आम्ही भारतासोबत एकत्र काम करत राहू!
प्रतिकूल हवामानापासून प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी ड्रॉप-ऑफ झोनवर एक अतिरिक्त फ्रंट पोर्च असेल. हरित स्थानकाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी ही रचना महत्त्वाची असेल. स्थानकात प्रवाशांच्या येण्याची आणि जाण्याची स्वतंत्र व्यवस्था असेल. फलाट क्र. ४/५वर एक मोठा एअर कॉन्कोर्स असेल, सर्व प्रवासी सुविधा एकाच ठिकाणी असतील आणि किरकोळ खरेदीची दुकाने, कॅफेटेरिया आणि मनोरंजन सुविधांसाठी जागा असेल. स्थानकात १२ लिफ्ट,१४ एस्केलेटर आणि इतर प्रवासी सुविधांसह फूड प्लाझा असतील.