अयोध्येतील प्रभू राम मंदिरातील पुजाऱ्यांना नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. आता इथून पुढे मंदिरातील पुजारी पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान केलेले दिसतील. हा ड्रेस कोड २५ डिसेंबरपासून लागू करण्यात आला आहे. ट्रस्टकडून सर्व पुजाऱ्यांना कपड्यांचे दोन सेट देण्यात आले आहेत.
मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्यासह एकूण १४ पुजारी राम मंदिरात काम करत आहेत. पुजाऱ्यांना मोबाईल फोन वापरण्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. आता सर्व पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोडही लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोड अनिवार्य नव्हता, पुजारी वेगवेगळ्या पोशाखात यायचे. मात्र, इथून पुढे आता तसे दिसणार नाहीये.
प्रत्येकी सात पुजाऱ्यांचे दोन गट करून १४ पुजाऱ्यांना राम मंदिरात पूजा करण्यासाठी नियुक्त केले आहे. सकाळच्या शिफ्टसाठी सात पुजाऱ्यांवर तर दुपार ते सायंकाळच्या पाळीसाठी सात पुजाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व पुजाऱ्यांना राम मंदिराव्यतिरिक्त कुबेर टिळा येथील शिवालय आणि हनुमान मंदिरातही पूजा करावी लागते. दरम्यान, पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केल्यामुळे राम मंदिराच्या पुजाऱ्यांची ओळख अधिक सोपी होणार आहे. मंदिरातील पुजारी आता पिवळ्या रंगाचा कुर्ता, पांढरी धोतर आणि डोक्यावर पिवळा फेटा परिधान केलेले दिसणार आहेत.
हे ही वाचा :