पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे आणि गर्दीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकाबाहेर पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे रिक्षा उभ्या केल्या जात असल्याचे चित्र आहे. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. रिक्षा चालकांना याबाबत हटकल्यास ते थेट हमरीतुमरीवर येतात. त्यामुळे रिक्षा चालकांच्या या मनमानी कारभाराला कोण रोखणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बोरिवली स्थानकात उपनगरीय लोकलसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील थांबतात. त्यामुळे या गाड्यांमधून येणाऱ्या नवख्या प्रवाशांकडून रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करून त्यांची फसवणूक करत असतात. तसेच गर्दीच्या वेळी सकाळी- संध्याकाळी भाडे मिळवण्यासाठी अनेक रिक्षा चालक रांगा सोडून त्यांना वाटेल तिथे रिक्षा उभ्या करत असतात. रिक्षाचा मीटर फेरबदल केलेला नाही अशी काही करणे देऊन मनमानी भाडेदेखील प्रवाशांकडून घेतले जाते.
हे ही वाचा:
… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!
ठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!
दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?
सोसायटीतील ‘सीसीटीव्हीं’नीच केली चोरी…वाचा!
रिक्षा चालकांच्या या बेशिस्तीमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा नसते. रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराला वेसण घालायला हवी, असे मत व्यक्त केले जात आहे. रिक्षा चालकांकडे बिल्ला आणि गणवेश दोन्ही असणे आवश्यक आहे. मात्र, बोरिवलीतील अनेक रिक्षा चालकांकडे दोन्ही नाही. या विरोधात आरटीओकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध असली तरी, त्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने तक्रारींची दखल घेतली की नाही हे समजत नाही.
रिक्षा चालकांच्या मनमानी विरोधात रेल्वेकडे तक्रार केल्यास ती जागा महापालिकेची आहे असे सांगण्यात येते. महापलिका आणि पोलिसांकडून कारवाई झाल्यास दोन- तीन दिवस सर्व सुरळीत असते. मात्र, त्यानंतर पुन्हा हाच प्रकार सुरू होतो, असे मत रामेश्वर जाधव यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केले.