भारतीय संघाने वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली तेव्हा भारतच वर्ल्डकप जिंकणार याची खात्री दिली जात होती. सलग ११ सामने जिंकणारा संघ म्हणून भारताचे नाव विश्वचषकावर कोरले जाईल असाही अंदाज व्यक्त होत होता. पण प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाने भारतीयांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचा पराक्रम केला. भारताचे मात्र तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाख प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला २४० धावांपर्यंत रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने अवघ्या ४ फलंदाजांना गमावून हे निर्धारित लक्ष्य पार केले. ट्राविस हेड याने केलेल्या नाबाद १३७ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने ही धावसंख्या ४३ षटकातच पार केली.
बोटाला झालेल्या दुखापतीमुळे हेडला चार सामन्यांना मुकावे लागले होते पण अंतिम सामन्यात त्याच हेडने भारताची डोकेदुखी वाढविली.
हेडचा पराक्रम
हेडने अंतिम सामन्यात शतकी खेळी करत रिकी पॉन्टिंग आणि ऍडम गिलख्रिस्ट यांच्या पंक्तीतही स्थान मिळविले. या दोघांनी ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून देताना वर्ल्डकप अंतिम सामन्यात शतके ठोकली होती. पॉन्टिंगने २००३मध्ये तर गिलख्रिस्टने २००७मध्ये शतकी खेळी साकारल्या होत्या. शिवाय, वर्ल्डकप अंतिम सामन्यात शतक ठोकणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला. व्हिव रिचर्डसनेही १३८ धावांची खेळी केलेली आहे.
भारतीय गोलंदाजांनी खरे तर २४० धावांचा बचाव करताना चांगली सुरुवात केली. त्यामुळे स्टेडियममधील प्रेक्षकांत उत्साहाची लाट निर्माण झाली. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ हे तीन फलंदाज अवघ्या ४७ धावा झआलेल्या असताना माघारी परतले. त्यामुळे आपण जिंकू शकतो, अशी आशा भारतीय संघात निर्माण झाली पण ट्राविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी केलेल्या १९२ धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाचे आणि तमाम भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीचाही त्यांनी योग्य सामना केला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. कर्णधार पॅट कमिन्सने परिस्थितीचे योग्य आकलन करत गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने ४० चेंडूंत ४७ धावांची खेळी केली पण शुभमन गिल (४) आणि श्रेयस अय्यर (४) हे झटपट माघारी परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली. रोहित शर्माचा ट्राविस हेडने घेतलेला झेल कपिल देवने १९८३च्या वर्ल्डकपमध्ये घेतलेल्या झेलची आठवण करून देणारा ठरला.
३ बाद ८१ धावा झालेल्या असताना विराट आणि के.एल. राहुल यांनी सूत्रे हाती घेतली पण त्यांना फार काळ टिकाव धरता आला नाही. दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या मात्र त्यातून भारताच्या धावसंख्येत मोठी भर पडली नाही. त्यानंतर रवींद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीचा व्यवस्थित अभ्यास कांगारूंनी केला होता. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध फार काही हातपाय हलवता आले नाहीत.
हे ही वाचा:
द्रविडचा प्रशिक्षक म्हणून अनोखा प्रवास; युवा विश्वचषक ते एकदिवसीय विश्वचषक फायनल
भारताने लष्कर मागे घ्यावे, मालदीवने केली विनंती
म्हणे – “मुस्लीम दुय्यम नव्हे तर समान नागरिक !”
नूंहमधील हिंसाचार टळला; अल्पवयीनांनी केली होती दगडफेक
सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माला अश्रु आवरले नाहीत. आपल्या कर्णधारपदाखाली वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता आले नाही. हा विश्वचषक राहुल द्रविडला अर्पण करण्याचा निर्धार त्याने केला होता पण ती इच्छाही अधुरीच राहिली.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते चषक प्रदान
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विजयी कर्णधार पॅट कमिन्सच्या हाती वर्ल्डकप सोपविण्यात आला. पंतप्रधानांनी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून विराट कोहलीला सन्मानित करण्यात आले तर सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला ट्राविस हेड.