वॉर्नर, मार्शच्या शतकांनी ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला विजय

पाकिस्तानवर केली ६२ धावांनी मात

वॉर्नर, मार्शच्या शतकांनी ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला विजय

वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानवर त्यांनी ६२ धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर ९ बाद ३६७ धावा केल्या. पाकिस्ताननेही कडवी झुंज दिली असली तरी त्यांचा डाव ३०५ धावांत आटोपला. आता या दोन्ही संघांचे दोन विजय आणि दोन पराभव नोंदविले गेले आहेत. दोघांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत पण ऑस्ट्रेलिया सध्या चौथ्या तर पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे. न्यूझीलंड ८ गुणांसह पहिल्या तर भारत ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

 

डेव्हिड वॉर्नरने १६३ धावांची खेळी केली तर मार्शने आपला ३२वा वाढदिवस साजरा करताना १२१ धावांची प्रभावी खेळी केली. मात्र ग्लेन मॅक्सवेल (०), स्टीव्ह स्मिथ (७), मार्नस लाबुशान (८), पॅट कमिन्स (६), जोश इंग्लिस (१३) यांनी साफ निराशा केली.

 

वॉर्नरच्या अवघ्या १० धावा झालेल्या असताना पाकिस्तानी क्षेत्ररक्षणातील अक्षम्य चुकीमुळे त्याचा झेल सुटला आणि त्याचा मोठा फटका पाकिस्तानला सहन करावा लागला. पाकिस्तानला रोखण्यात ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ५३ धावांत ४ बळी घेतले.

 

ऑस्ट्रेलियाच्या या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानने बिनबाद १३४ अशी दमदार सुरुवात केली होती. इमाम अल हक (७०) आणि अब्दुल्ला शफिक (६४) यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते पण ही सलामीवीरांची जोडी गेल्यानंतर मात्र मोहम्मद रिझवानची ४६ धावांची खेळी, सौद शकीलच्या ३० धावा हीच काय ती पाकिस्तानची बरी खेळी ठरली. त्यामुळे त्यांना ३०५ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.

हे ही वाचा:

फडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!

४३ वर्षांनी बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

चंद्रकात पाटील म्हणाले, माझ्या बॅगेत ८ शर्ट!

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

 

ऑस्ट्रेलियाच्या डावातही केवळ सलामीवीर वॉर्नर आणि मार्श यांनी केलेली शतके सोडली तर बाकी फलंदाजांनी निराशाच केली. तरीही वॉर्नर आणि मार्श यांच्या २५९ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा पायाच भक्कम झाला. वर्ल्डकपमधील ही सलामीच्या जोडीने केलेली सर्वोत्तम कामगिरी ठऱली. वॉर्नरच्या या दीडशेपेक्षा अधिक धावांत १४ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या शाहिन शहा आफ्रिदीने ५४ धावांत ५ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीला लगाम घालण्यात यश मिळविले. त्याच्या या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने अखेरच्या १० षटकांत सहा फलंदाज गमावले. हारिस रौफने ३ बळी घेतले.

 

पाकिस्तानची पुढील लढत अफगाणिस्तानशी आहे तर ऑस्ट्रेलियाला नेदरलँड्सशी झुंजायचे आहे. नेदरलँड्सने याआधीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

 

Exit mobile version