एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १० सामने अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध नांगी टाकली. त्याबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने मत व्यक्त केले आहे.
‘ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्ध अंतिम सामन्यात खेळायचे असल्याने भारतीय संघ दबावाखाली होता. त्यामुळे हा सामना त्यांनी गमावला. तुम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियाचा सामना करता, तेव्हा ते अतिशय दुर्दैवी असते. मी माझ्या करीअरमध्ये याचा अनेकदा अनुभव घेतला आहे. हे काम सोपे नसते. ऑस्ट्रेलिया हा मजबूत प्रतिस्पर्धी होता. तसेच, त्यांच्याकडे अंतिम सामन्यात सामना फिरवण्याची आणि अनुकूल परिणाम साधण्याची क्षमता आहे,’ असे पीटरसन याने स्पष्ट केले.
हे ही वाचा:
फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!
मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!
पक्ष प्रमुखच नाहीत, तर पक्षादेश कुठला?
४१ मौल्यवान जीवांना वाचवणाऱ्या व्यक्तींचे महिंद्रा यांनी मानले आभार
लीजंड्स क्रिकेट लीग स्पर्धेसाठी भारतात आलेल्या पीटरसनने अंतिम सामन्याबाबत टिप्पणी केली. ‘ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चांगले प्रतिस्पर्धी असतात. भारताचे हे दुर्दैव होते की, ऑस्ट्रेलियाने चांगले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली. त्यानंतर जेव्हा ते फलंदाजीसाठी उतरले तेव्हा २३० किंवा २४०चे लक्ष्य पुरेसे नव्हते,’ असे पीटरसन म्हणाला.
पीटरसनने विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडच्या कामगिरीला भयंकर असे संबोधले. आम्ही अंतिम सामन्यात पोहोचणार नाही, हा विचार कोणीच केला नव्हता, असे तो म्हणाला. ‘भारत जेव्हा विश्वचषक स्पर्धेआधी इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीमध्ये खेळत होता, तेव्हा हेच दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचतील, असे मी म्हटले होते. मात्र इंग्लंडने जसा खेळ केला, तशी अपेक्षा कोणीच केली नव्हती,’ असे पीटरसनने सांगितले.