भारताविरुद्ध वर्ल्डकप अंतिम फेरीत कोण खेळणार याचे उत्तर गुरुवारी मिळाले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दुसऱ्या उपांत्य सामन्यातून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सनी हा सामना जिंकला. आता रविवारी भारताशी ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकप जिंकण्यासाठी गाठ पडेल. ही ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक मारण्याची आठवी वेळ आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या २१२ धावा केल्या तिथेच खरेतर ऑस्ट्रेलियाचे पारडे जड झाले होते. मात्र ही धावसंख्या गाठताना कांगारूही चांगलेच दमले. त्यामुळे एकवेळ अशीही शक्यता निर्माण झाली की, दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकेल. पण अखेरीस ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचे ते स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या २१२ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची स्थिती ५ बाद १३७ झाली होती. त्यावेळी कुठेतरी दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाचा दरवाजा किलकिला झाल्यासारखे वाटत होते. पण त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. ट्राविस हेड (६२), डेव्हिड वॉर्नर (२९), स्टीव्ह स्मिथ (३०), जोश इन्ग्लिस (२८) यांच्यासोबतच मिचेल स्टार्क (१६) आणि पॅट कमिन्स (१४) यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा विजय अक्षरशः खेचून आणला. दक्षिण आफ्रिकेने ४९.४ षटकांत २१२ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाला ही धावसंख्या गाठताना ४७.२ षटके लागली.
हे ही वाचा:
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला औषधातून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे!
उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’!
प्रशांत कारुळकर यांच्या जन्मदिनी आशीर्वाद देणार जैन मुनी…
दिवाळीत मुंबई विमानतळावर ये- जा करणाऱ्या विमानांची संख्या १ हजार पार!
आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा संघ भारताशी भिडणार आहे. भारताची ही वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची चौथी वेळ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कशी कमाल करून दाखवतो याची आता उत्सुकता लागून राहिली आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ज्या २१२ धावा केल्या त्यात डेव्हिड मिलरच्या १०१ धावांचा समावेश होता. म्हणजे उरलेल्या शंभरएक धावा बाकी फलंदाजांनी केल्या. त्यात हेन्रिक क्लासेनची ४७ धावांची खेळीही समाविष्ट होती. दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच वाईट झाली. अवघ्या २४ धावांत त्यांचे ४ फलंदाज माघारी परतले होते. मात्र त्यानंतर मिलर क्लासेन यांनी पाचव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला निदान दोनशेच्या पलिकडे जाता आले. अडीचशेचा टप्पा गाठला असता तर त्यांना ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणण्यास आणखी मदत मिळाली असती, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या.