मुराद आणि औरंगजेबाच्या सैन्यावर चालून आलेला जसवंतसिंह १५ एप्रिल रोजी धर्मत येथे दोघांना सामोरा गेला. फार मोठे युद्ध होऊन राजपुतांचे प्रचंड नुकसान झाले. जसवंतसिंहाला माघार घ्यावी लागली. बरोबर आणलेले लष्करी साहित्य मागे सोडून त्याने आग्र्याकडे माघार घेतली. औरंगजेब व मुराद दोघे दुसऱ्यादिवशी उज्जैनला पोहोचले आणि टप्याटप्याने चाल करत १० मी रोजी ग्वाल्हेरला. औरंगजेब आणि मुराद दोघेही आग्र्याच्या अंगणात पोहोचले आहेत हे बघून दारा स्वतः सैन्य घेऊन निघाला. धोलपूर येथे त्याने आपला मजबूत मोर्चा वसवला. दाराची स्थिती मजबूत होती फौज ताजी होती. मात्र धोलपूरच्या पूर्वेस चंबळ नदीला एक उतार असून तिथे फक्त गुडघाभर पाण्यातून तोफा नेता येतील इथे दाराचे मोर्चे नाहीत अशी माहिती मिळाल्यावर २१ मे च्या संध्याकाळीच औरंगजेब मोठमोठ्या कूच करत निघाला व दीड दिवसात नदीच्यापलीकडे पोहोचला. हा प्रवास इतका खडतर होता कि तब्बल पाच हजार सैन्य वाटेत हाल होऊन मेले अशी नोंद आहे. पण सत्तेच्या बुद्धिबळात राजा वाचावा म्हणून प्यादी बळी दिली जातात तोच नियम इथे लागू होत होता. औरंगजेबाने नदी ओलांडल्याने दाराने उभ्या केलेल्या संरक्षण फळीला काडीची किंमतही उरली नाही. उलट वेगाने आग्र्याकडे सरकता यावे म्हणून तोफखाना त्याला धोलपूरलाच सोडून माघार घ्यावी लागली. २६ मे रोजी तो आग्र्यापासून दहा मैल अंतरावर समूगढ येथे पोहोचला व तिथे आपली नवीन संरक्षण फळी उभारली. सुलेमान शुकोहने जयसिंगाचा सल्ला ऐकला असता तर दाराकडे मोठी फौज उपलब्ध असती पण यावेळी सुलेमान शुकोह बिहारमध्ये परतीच्या वाटेवर होता.
या पूर्वीचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा:
१. आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)
२. दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)
३. औरंगजेबाची दक्खन कामगिरी (भाग ३)
२९ मे रोजी दुपारी युद्धाला तोंड फुटले. दाराने तोफखाना उघडला पण औरंगजेबाचे सैन्य तोफेच्या टप्प्यापलीकडे असल्याने काहीच नुकसान झाले नाही. औरंगजेब शांत राहिला. आपल्या तोफखान्याचा उपयोग होत नाहीसा बघून दाराने अखेर आघाडी उघडली. त्याचे सैन्य जवळ येताच औरंगजेबाने आपला तोफखाना खुला केला. दाराच्या पहिल्या फळीच्या जणू लाह्या भाजल्या गेल्या. मात्र दाराच्या सैन्यातील राजपुतांनी अतुल पराक्रम केला. जोहार करत ते मुरादाच्या सैन्यावर चालून गेले. मुरादची बिघडणारी अवस्था बघून खुद्द औरंगजेबाने आपला हत्ती त्या दिशेने वळवला व मोजक्या दलासह पुढे सरकू लागला. राजपूत आता औरंगजेबाच्या हत्तीला भिडले औरंगजेबाच्या हत्तीला त्यांनी जखमी देखील केले. यावेळी दाराने जोर केला असता तर युद्धाचा निकाल फिरला असता. मात्र यावेळी दारा आपली उजवी फळी वाचविण्यासाठी स्वतःच्या तोफखान्यासमोरून आडवा जाऊ लागला. अर्थात तोफखाना बंद करावा लागला व विस्कळीत झालेल्या औरंगजेबाच्या सैन्याला उसंत मिळाली. त्यांनी औरंगजेबाच्या हत्तीभोवती जमलेल्या राजपुतांची कत्तल केली. आता औरंगजेबाचा तोफखाना पुढे सरकला व तो दाराच्या हत्तीच्या दिशेने मारा करू लागला. दाराचा हत्ती त्यात जखमी झाला. दाराची तुकडी पांगली. स्वतः दारा हत्तीवरून उतरला आणि घोड्यावर स्वार झाला. आपला नेता हत्तीवर दिसत नाही हे बघून आपला पराभव झाला असे समजून त्याची सेना वाट मिळेल तिथे पळू लागली. दाराच्या हातून समूगढच्या रणांगणात सत्ता निसटून गेली.
यानंतर दारा आग्र्याला आला पण “मी माझे पराभूत तोंड घेऊन तुमच्यासमोर येऊ इच्छित नाही. आता यापुढील मार्ग सुकर व्हावा म्हणून मला आशीर्वाद द्या.” असा निरोप त्याने शहाजहानला पाठविला. बरोबर शक्य तितकी बहुमूल्य रत्ने व सोन्याची नाणी घेऊन तो दिल्लीकडे निघाला. औरंगजेबाने समूगढच्या विजयाचे सगळे श्रेय मुरादला दिले. त्याच्या जखमांवर स्वतः मलमपट्टी केली. १ जून रोजी औरंगजेब आणि मुराद आग्र्याबाहेर पोहोचले. तिथे त्यांनी दहा दिवस मुक्काम केला. आग्र्यातून अनेक दरबारी मंडळी त्यांना येऊन मिळाली. शाहजहानाने औरंगजेबाला भेटीस येण्याचा निरोप पाठविला पण तू किल्ल्यात प्रवेश करताच शहाजहानच्या अंगरक्षकांपैकी तार्तार स्त्रियांचे दल तुझ्यावर हल्ला करणार आहे असे सांगितल्यावर त्याने भेटीला जाणे टाळले. त्याने उलट आग्रा किल्ल्याला वेढा दिला. किल्ला इतका मजबूत होता कि तोफखाना वापरून फायदा नव्हता. म्हणून मग त्याने किल्ल्यात जाणारे यमुनेचे पाणी तोडले. तीन दिवसात किल्ल्यात पाण्याची वानवा होऊ लागली. “आपल्या बापाला तहानलेला ठेवण्याचे पाप तू करतो आहेस” असा निरोप शाहजहानाने पाठवला त्यावर “हे तुमच्याच करणीचे फळ असून मला सैन्यासह आत येण्याची परवानगी द्यावी. कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची हमी मी देतो.” असा उलट निरोप त्याने शहाजहानला पाठवला. अखेर चौथ्या दिवशी शाहजहानाने हार मानली. औरंगजेबाचे सैन्य किल्ल्यात आले. सर्वत्र पहारे बसले. शहाजहान महालात नजरकैद झाला. जहानआरा हिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेबाने तिचा प्रस्ताव अमान्य केला.
हे सर्व सुरु असताना उतावीळ झालेला मुराद आपल्या तख्तपोशीची तयारी करू लागला. औरंगजेबाने त्याला सबुरीचा सल्ला दिला, पण उलट मुराद औरंगजेबाच्या माणसांना फितवू लागला. औरंगजेबाने त्याला मेजवानीच्या निमित्ताने सरळ बोलणी करून टाकू म्हणून निमंत्रण धाडले. त्याला २२ लाख रुपये आणि २०० हुन अधिक घोडे नजर केले. अखेर १५ जून रोजी मेजवानीचा दिवस ठरला. मुरादाचे जंगी स्वागत करून त्याला उंची दारू पाजून जवळपास बेशुद्ध केले. एका दासीने त्याचे पाय चेपून द्यायला सुरुवात केली व तो गाढ झोपल्यावर त्याची शस्त्रे काढून घेतली. त्याला शुद्ध आली तेव्हा शेख मीर याने त्याला बंदी बनविले. पडद्यामागे उभा असलेला औरंगजेब पुढे येऊन म्हणाला “उतावीळपणे तुझे डोके फिरले आहे. त्यामुळे आता काही दिवस तू विश्रांती घे. सगळ्या गोष्टी पार पडल्या कि आपल्या वचनाप्रमाणे राज्याची वाटणी होईल.” मग सोन्याच्या बेड्या घालून त्याला ग्वाल्हेरच्या किल्यात पाठविले. मुराद तिथे तीन वर्ष बंदिस्त होता. पुढे अलीनाकी नामक अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या बापाच्या खुनाचा आरोप मुरादवरती ठेवला व आपल्या बापाच्या रक्ताचा बदला म्हणून मुरादाचे रक्त हवे अशी मागणी केली. ४ डिसेंबर १६६१ रोजी किल्ल्याच्या तुरुंगात दोन गुलामांनी मुरादचा शिरच्छेद केला.
संदर्भ –
१) हिस्टरी ऑफ औरंगजेब- सर जदुनाथ सरकार
२) द एम्परर हू नेव्हर वॉज- सुप्रिया गांधी
३) सिंध इन मुघल एम्पायर- अमित पालीवाल
४) मुसलमानी रियासत भाग २ – रियासतकार सरदेसाई
५) स्टोरिया डो मोगोर- निकोलाओ मनुची
६) औरंगजेब: शक्यता आणि शोकांतिका- रवींद्र गोडबोले
जय श्रीकृष्ण
अप्रतिम
त्रिवार अभिवादन
पुढील कार्यास कोटी कोटी शुभेच्छा
आभार
राजू गांधी
पुणे
9822052586
अप्रतिम