28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषऔरंगजेबाची मराठ्यांवरील पहिली शाही स्वारी- शाईस्ताखान (भाग ६)

औरंगजेबाची मराठ्यांवरील पहिली शाही स्वारी- शाईस्ताखान (भाग ६)

आपला शत्रु कळला की मग आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व अधिक लक्षात येतं. त्यामुळेच मराठ्यांचे तीन छत्रपती ज्या औरंगजेबाशी झुंजले त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा हा प्रयत्न! औरंगजेबाने सत्ता बळकवल्यानंतर मराठ्यांवर आखलेली पहिली मोहिम म्हणजे शाईस्ताखानाची आणि दुसरी स्वारी म्हणजे आसाममधील आहोमांवरील स्वारी! या स्वारीबद्दल या लेखात पाहू...

Google News Follow

Related

१६५९चा शेवट दख्खनमध्ये एका नव्या घटनांची साखळी सुरु करणार होता. आदिलशाही सरदार अफझलखान आदिलशाही मुलुखात बंडखोरी करतात म्हणून शिवाजीराजांवर चालून आला होता. औरंगजेबाचा या दोघांवरही राग होता. शिवाजी महाराजांनी त्याच्याच कार्यकाळात जुन्नर, नगर, कल्याण-भिवंडी लुटले म्हणून आणि दोन वर्षांपूर्वीच बीदर भागातील एका लढाईत अफझलखानाच्या कचाट्यातून तो कसाबसा वाचला नाहीतर थेट कैदच होणार होता. त्यामुळे दोघांपैकी कोणीही मेले – जगले तरी त्याला आनंद किंवा दुःख काहीच झाले नसते. १० नोव्हेंबर १६५९ प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ठार केले. पूर्ण दख्खन अफझलखानाच्या नावाने चळचळ कापत असे त्यालाच एका साध्याश्या वाटणाऱ्या बंडखोराने असे फटक्यात ठार केले हे ऐकून अनेकांचे डोळे फिरले. अफझलखानाच्या मृत्यूचा धक्का विजापूर दरबाराने पचविण्याआधीच शिवाजी महाराजांनी सातारा, कोल्हापूर, अथणी, मायणी वगैरे घाट आणि कर्नाटकी भागात आपला जम बसवला. मिरजजवळ फाझलखान आणि रुस्तुमेजमानच्या संयुक्त सैन्याला काही तासात धूळ चारली. हा मामुली बंडखोर नाही वेळीच याचा बंदोबस्त करायला हवा हा विचार करून विजापूरने प्रचंड सैन्यासह अजून एका नामांकित सरदाराला शिवाजी महाराजांवर पाठवले – सिद्दी जौहर. महाराजांनीही मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्यापर्यंत माघार घेतली.

३ मार्च १६६०,  पन्हाळ्याला जौहरचा वेढा पडला. याच दरम्यान विजापूर दरबाराने दिल्लीला एक अर्ज पाठवला. बंडखोर शिवाजी भोसला दख्खनमध्ये काफिर सल्तनत उभी करू पाहत आहे. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे असून तुम्ही मोठ्या सैन्यासह एखादा शाही सिपहसालार पाठवावा आणि दगाबाज काफराचे उच्चाटन करून टाकावे. दोन वर्षांपूर्वी हाच औरंगजेब विजापूर गिळायला उत्सुक होता. पण शिवाजीराजे हे प्रकरण आपल्याला एकट्याने झेपायचे नाही या शंकेने विजापूर दरबार दिल्लीकरांना साद घालत होता. अखेर शिवाजीराजांच्या निमित्ताने औरंगजेबाला दख्खनमधली आपली प्यादी पुन्हा मैदानात उतरवायची संधी मिळत होती. तसंही शहाजहानच्या आजारपणामुळे विजापूर, गोवळकोंडा यांच्याशी झालेले करारमदार अर्धवट सोडून त्याला उत्तरेत यावे लागले होते. दख्खनमधील केवळ कागदावर असलेला भूभाग प्रत्यक्षात ताबा घ्यावा म्हणून त्याने एक तोलामोलाचा सरदार निवडला जणू प्रति-औरंगजेबच. अमीर-उल-उमरा नबाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ “शाईस्तेखान”. हा औरंगजेबाचा औरंगजेबाचा मामा. औरंगजेबाला सत्ता मिळावी म्हणून भल्याबुऱ्या परिस्थितीत त्याच्या पाठीशी ठाम उभा राहणारा. औरंगजेबाच्या अत्यंत विश्वासातील माणूस. शाईस्तेखान तसाही औरंगाबादमध्येच होता. त्याच्या नावाने फर्मान निघाले.

हे ही वाचा:

१. आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)

२. दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)

३. औरंगजेबाची दक्खन कामगिरी (भाग ३)

४. औरंगजेबाची सत्तेकडे वाटचाल (भाग ४)

५. औरंगजेब दिल्लीची सत्ता बळकावतो (भाग ५)

२८ जानेवारी १६६०, औरंगाबादची व्यवस्था मुख्तारखानाकडे सोपवून तब्बल सत्त्याहत्तर हजार घोडेस्वार, तीस हजार पायदळ, चारशे भांडते हत्ती, शंभर फरासखान्याचे हत्ती, पिलनाळा, शुत्तरनाळा, जेजाले, तोफखाना असे प्रचंड सैन्य घेऊन नगर – पेडगांवमार्गे शाईस्तेखान स्वराज्यात शिरला. सुपे – बारामती – शिरवळ – सासवड  करत करत तो ९ मे रोजी पुण्यात आला. खासा लाल महाल मुक्कामासाठी नक्की केला. दुसरीकडे मराठे त्याच्यावर गनिमी काव्याने हल्ले करत होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी त्याने काही फौज आजूबाजूच्या परिसरात धाडली. राजगडाच्या आजूबाजूच्या आसमंतातातील गावे लुटून बेचिराख केली. शाईस्तेखानाने चाकणला वेढा दिला. हा वेढा तब्बल छप्पन दिवस चालला. या दरम्यान महाराज पन्हाळ्यावर अडकले होते. स्वराज्यावरती एकाचवेळी मुघल, आदिलशाह तब्बल दीड लाखांची फौज घेऊन आले होते. अखेर १६६० च्या जुलैमध्ये मोठ्या धाडसाने महाराजांनी पन्हाळगडावरून आपली सुटका करून घेतली. मग एक आघाडी शांत करण्यासाठी त्यांनी पन्हाळ्यासारखा बुलंद किल्ला आदिलशहाला देऊन टाकला. आता त्यांचे लक्ष लागून राहिले शाईस्तेखानाकडे.

शाईस्तेखानाने स्वराज्यात धुमाकूळ घातला होताच त्याने कल्याण -भिवंडी भागात पुन्हा मुघलांचा अंमल बसवला  सोबत विजापूरकरांकडून जुन्या करारानुसार मिळणारा परिंडा किल्ला ताब्यात घेण्यासाठी कारतलबखानास रवाना केले. त्याने किल्ला लाच देऊन ताब्यात घेतला. परिंडा जिंकला म्हणून दिल्लीला एक प्रतीकात्मक किल्ली वाजतगाजत पाठविली गेली. परिंड्यासारखा मजबूत किल्ला मिळाल्याने औरंगजेबाची तब्येत खुश झाली. याच वेळी मीर जुम्ला याला आसामवरती आक्रमण करण्याची आज्ञा दिली. १६६० चा उत्तरार्ध औरंगजेबासाठी महत्वपूर्ण ठरला. दाराचा मोठा मुलगा सुलेमान शुकोह काश्मीर मधील एक राजा पृथ्वीसिंग याच्या आसऱ्याने सुरक्षित होता. सुलेमान शुकोह याला तिथून पकडून आणण्याची जबाबदारी औरंगजेबाने जयसिंगावर टाकली. समूगढच्या लढाईपर्यंत दाराच्या पक्षात असलेला जयसिंग आता औरंगजबाच्या पक्षात आला होता. त्याने पृथ्वीसिंगाचा मुलगा मेदिनीसिंग याच्याशी गुप्त संधान बांधून लडाख भागातून टेकड्या ओलांडून पळून जाणाऱ्या सुलेमान शुकोह याला पकडले. सुलेमान शुकोह याला जेव्हा औरंगजेबासमोर उभे केले तेव्हा निडरपणे सुलेमान म्हणाला माझी गर्दन मारायची तर मारा पण मला पौस्ता (अफूचे सरबत) देऊ नका. भर दरबारात औरंगजेबाने त्याला वचन दिले कि कुराणाची आण घेऊन तुला सांगतो कि तुला पौस्ता देणार नाही. पुढे त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात डांबले आणि वचनाला हरताळ फासून पौस्ता किंवा अतिरिक्त अफूचे सेवन करायला भाग पाडले. त्यातच हळूहळू निकामी बनून  दीड वर्षात सुलेमान शुकोहचा अंत झाला. सुलेमान शुकोह हाती लागल्याने त्याच्या सिंहासनाला असलेला शेवटचा धोका संपला होता.

आता औरंगजेबाने नजरकैदेत शहाजहानचा मानसिक छळ मांडला. शहाजहान व दाराच्या संपत्तीची तो मागणी करू लागला. या दरम्यान दोघातील पत्रव्यवहार हा एकमेकांवर यथेच्छ दोषारोप करणारा आहे. दारा इस्लामचा नाश करून हिंदूंना प्रोत्साहन देत होता. मी केवळ इस्लामचा सेवक म्हणून सिंहासनावर बसलो आहे. अश्या आशयाची पत्रे औरंगजेबाने शहाजहानला लिहिली व त्यात शहाजहानच्या विलासी जीवनावरही टीका केली. यावर “तू बादशहा नसून इतरांच्या मालमत्तेवर डल्ला मारणारा एक लुटारू आहेस” अशी निर्भत्सना शाहजहानाने देखील केली. वरून “तुझी मुले देखील एक दिवस तुझ्याशी अशीच वागतील हे लक्षात ठेव” असे शिव्याशापही त्याने दिले. शहाजहानची ही हाय औरंगजेबाचे काय वाकडे करणार होती हे येणारा काळच ठरवणार होता.

१६६१च्या सुरुवातीला एकीकडे आराकानला पळून गेलेल्या शुजाच्या मृत्यूची बातमी त्याला मिळाली. सर्वस्व गमावून परागंदा झालेला शुजा परस्पर मारला जाणे ही औरंगजेबासाठी आनंदाची बाब होती. मात्र दख्खनमधून येणाऱ्या बातम्या त्याला अस्वस्थ करत होत्या. शिवाजीराजांनी उंबरखिंडीत कारतालबखानच्या मोठ्या सैन्याचा अल्प सैन्याच्या साहाय्याने पराभव करून त्याला लुटून अत्यंत अपमानास्पद अवस्थेत पिटाळून लावले होते.  शाईस्तेखानाचे चाकण प्रकरणात हात पोळले होते. म्हणून त्याने डोंगरी किल्ल्यांच्या वाटेला न जाण्याचे ठरवले. त्याऐवजी उत्तर कोकणावर ताबा मिळविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या. मग शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकणात धडक मारून पार शृंगारपूरपर्यंत आपल्या राज्याची सीमा वाढवली. आता स्वराज्याची सीमा गोव्याला भिडली.

नोव्हेंबरमध्ये मीर जुम्ला बारा हजार घोडदळ आणि तीस हजार पायदळ, नदीतील हालचालींसाठी गलबते – गुराब वगैरे घेऊन गुहावटीच्या दिशेने निघाला. आसाम सीमेवरील कुचबिहारचे राज्य त्याने जिंकले. तिथले एक मोठे मंदिर उध्वस्त करून मशीद बांधली आणि कुचबिहारचे नाव ठेवले “आलमगीर नगर”. पुढील तीन-चार महिन्यात मुघलांनी आहोमांचा ठिकठिकाणी पराभव करत आसामच्या आत सरकणे सुरु ठेवले. हे युद्ध मुघलांना जड जात होते पण तरी केवळ मीर जुम्लाच्या चिकाटीमुळे मुघल तग धरून राहिले. पुढे तब्बल सव्वा वर्ष युद्ध – रोगराई यांना तोंड देत मुघलांनी टिपमपर्यंत धडक मारली. आहोम राजांनी तहाची बोलणी लावली. याच मोहिमेत आजारी पडून मार्च १६६३ मध्ये मीर जुम्लाचा अंत झाला.

१६६२ मधला रमजान औरंगजेबाचा जीवच घेऊन जाता जाता राहिला. ऐन उन्हाळ्यात आलेल्या रमजानच्या कडक पालनाने औरंगजेबाला कमालीचा अशक्तपणा आला. इतका कि ताप येऊन तो अंथरुणाला खिळला. मधून मधून त्याची शुद्ध जाऊ लागली. औरंगजेब “दर्शन” देत नाही हे बघून दिल्लीत कुजबुज वाढली. औरंगजेबास वारस कोण? मुअज्जम कि आझम? त्यात औरंगजेबाच्या धाकट्या बहिणीने – रोशनआराने आझमची बाजू घेतली व औरंगजेबाचे शिक्के स्वतःकडे घेऊन काही पत्र व्यवहार केला. चार दिवसांनी औरंगजेब शुद्धीवर आला आणि त्याला सगळी परिस्थिती समजली. त्याने पहिले काही केले असेल तर तो आधार घेऊन काठी टेकत दिवाण – ई – आममध्ये गेला व  लोडाला टेकून काही काळ त्याने सर्वांना दर्शन दिले. यामुळे सगळ्या शंकांना पूर्णविराम मिळाला. महिनाभरात औरंगजेब पूर्ण बरा झाला. त्यानिमित्त दरबारातील उमरावांना मेजवानी दिली गेली. नंतर काही महिने हवापालट म्हणून औरंगजेब लाहोरला गेला. तिथे आपली मुलगी जुबेदतउन्निसा हिचा निकाह दाराचा धाकटा मुलगा सिपाहार शुकोह याच्याशी करून दिला. औरंगजेबाच्या इतर दोन मुली झेबुन्निसा व जिनतउन्निसा या मात्र आयुष्यभर अविवाहित राहिल्या.

इकडे दख्खनमध्ये एक वेगळीच घटना घडली जिने मुघल मुळापासून हादरले. एप्रिल महिन्यात ऐन रमजानच्या महिन्यात शिवाजी महाराजांनी लाल महालात उतरलेल्या शाईस्तेखानवर अचानक छापा मारला. त्यात वास्तविक शाईस्तेखान मरायचाच पण  नशीब बलवत्तर म्हणून त्याने खिडकीतून उडी टाकल्याने भवानीचा निसटता घाव बसून त्याची केवळ तीन बोटे तुटली. शाईस्तेखानाचा मुलगा मारला गेला. छावणीत पराकोटीचा गोंधळ उडाला त्यातच शिवाजी महाराज आलेल्या साथीदारांसह सिंहगडाच्या दिशेने निघून गेले. या छाप्यानंतर शाईस्तेखान इतका घाबरला होता कि त्या रात्री त्याने हकिमांनाही जवळ येऊ दिले नाही. न जाणो हकीम बनून त्या दगाबाज सैतान शिवाजीनेच हल्ला केला तर?? त्याला जादूटोणा येतो …  त्याला तीस हात उंच उडी मारता येते …. आणि अनेक अफवांचे पीक पुढले काही दिवस त्या छावणीत आले. तीन बोटे तुटलेला शाईस्तेखान हा मुघलांच्या फजितीचे जिवंत स्मारक बनला. मुघलांची अब्रू एका रात्रीत धुळीला मिळाली. औरंगजेबाने त्याची बदली बंगाल आणि आसाम प्रांतावर केली. तसेही मीर जुम्लानंतर तिथे परिस्थिती सांभाळायला कोणीतरी हवे होतेच. शाईस्तेखानाच्या मनात सुडाची आग पेटली होती. मी त्या कम्बख्त बंडखोराला संपवतो मगच इथून जाईन मला एक संधी दे म्हणून त्याने औरंगजेबाला खूप विनवणी केली पण “संतापाच्या भरात माणूस चुका करत जातो, त्यामुळे आपले अधिक नुकसान होईल.” असे सांगून औरंगजेबाने अखेरीस शाईस्तेखानाची मागणी फेटाळली. आपल्या तुटक्या बोटांवर फुंकर घालत शाईस्तेखान खिन्न मानाने बंगालाकडे निघून गेला.

(क्रमशः)

संदर्भ –

१) हिस्टरी ऑफ औरंगजेब- सर जदुनाथ सरकार

२) द एम्परर हू नेव्हर वॉज- सुप्रिया गांधी

३) सिंध इन मुघल एम्पायर- अमित पालीवाल

४) मुसलमानी  रियासत भाग २ – रियासतकार सरदेसाई

५) स्टोरिया डो मोगोर- निकोलाओ मनुची

६) शककर्ते शिवराय

७) राजा शिवछत्रपती.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा