आता औरंगजेबासमोर मुख्य आव्हान होते ते दाराचे. शुजाची हालत खराब असून त्याच्यात सत्ता परत घेण्याइतके बळ आणि पाठिंबा नाही हे त्याने ओळखले. त्याचा मुख्य रोख आता दारावरती होता. त्याने दिल्लीकडे आपले सैन्य पाठविले. मात्र दारा अगोदरच लाहोरकडे गेल्याची बातमी आली. लाहोर येथे दाराने वीस हजारांची फौज जमा केली. औरंगजेब स्वतः सहा जुलैला दिल्लीत आला आणि २१ जुलै रोजी त्याने तख्तावर कोण बसणार या चर्चेला पूर्णविराम देण्याच्या दृष्टीने आपला राज्याभिषेक करून घेतला. औरंगजेबाचा विश्वासू सरदार बहादूरखान दाराच्या मागावर होता. पाठोपाठ औरंगजेबही सतलजपर्यंत पोहोचला आता त्याला शेवटचा सोक्षमोक्ष लावायचा होता. दाराच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. पुढील तीन महिने दारा लाहोर, सक्कर, मुलतान, भक्कर, शेवान, ठठ्ठा असा फक्त पळत राहिला. अखेर तो कच्छच्या रणातून जीवघेणा प्रवास करून अहमदाबाद येथे पोहोचला व अहमदाबाद ताब्यात घेतले सुरत येथून तोफखाना मागविला आणि तब्बल २२००० सैन्य जमवले. जसवंतसिंगाला ही बातमी समजताच समूगढच्या पराभवाने दुखावलेल्या जसवंतसिंगाने त्याला अजमेर येथे बोलावले. याचवेळी शुजा देखील अलाहाबादच्या दिशेने पुन्हा निघाल्याची बातमी आली. म्हणजे औरंगजेबावर आता दुहेरी आक्रमण होणार होते.
हे ही वाचा:
१. आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)
२. दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)
३. औरंगजेबाची दक्खन कामगिरी (भाग ३)
४. औरंगजेबाची सत्तेकडे वाटचाल (भाग ४)
औरंगजेबाने आपला मुलगा सुलतान महंमद याला शुजावर पाठविले. मात्र शुजाने आपल्या आपली मुलगी गुलरूख बानू बेगम हिच्याशी लग्न लावून देतो आणि तुला सत्तेवर बसवतो असे वचन देणारे गुप्त पत्र सुलतान महंमदला पाठविले. सुलतान महंमद आपल्या काकाच्या या जाळ्यात अडकला. त्याने औरंगजेबाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. महत्वाचे म्हणजे यावेळी जसवंतसिंग औरंगजेबाच्या सैन्यात सामील झाला होता. खाजवा येथे ३ जानेवारी येथे दोन्ही सैन्य समोरासमोर आली आणि दिवसभर युद्ध झाले. युद्धाचा निर्णय काही लागला नाही. सगळे युद्धाच्या वेषातच झोपी गेले. जसवंतसिंगाने रात्री शुजाला निरोप निरोप पाठविला कि पहाटे जेव्हा औरंगजेबाच्या छावणीत गोंधळ ऐकू येईल तेव्हा समोरून त्याने हल्ला करावा. ठरल्याप्रमाणे पहाटे राजपुतांनी आरडाओरड सुरु करून लुटालूट माजवली. हा गोंधळ शुजाच्या सैन्यापर्यंत गेला. पण हि आपल्याला फसविण्याची चाल आहे असे समजून शुजा जागचा हलला नाही. बराचवेळ शुजाकडून हालचाल होत नाही म्हणून जसवंतसिंग पाठच्यापाठी निघून गेला. गोंधळलेले काही सैन्य शुजाला जाऊन मिळाले. यावेळी औरंगजेब पहाटेचा नमाज पढत होता. त्याला कुणीतरी जसवंतसिंग पळून गेल्याची बातमी दिली तसे फक्त काहीही न बोलता हातानेच त्याने “गेला तर जाऊ दे!” अशी खूण केली व नमाज सुरु ठेवला. नंतर तो म्हणाला कि “जसवंतसिंग आधीच पळून गेला ही उलट अल्लाची कृपा आहे. लढाई सुरु असताना त्याने दगा दिला असता तर कठीण प्रसंग ओढवला असता.” जसवंतसिंग गेल्यावरही औरंगजेबाकडे तब्बल पन्नास हजारांचे सैन्य होते. दुसऱ्या दिवशी लढाईला प्रारंभ होताच औरंगजेबाच्या सैन्याने सुलतान महंमद आणि शुजाच्या सैन्याचा पराभव केला. शुजा आणि त्याची मुलगी आराकानच्या दिशेने पळून गेले. पुढे शुजा आराकान राजाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. महम्मद सुलतानला अटक झाली. औरंगजेबाने त्याला कायमसाठी नजरकैदेत ठेवले. त्याचे दुसरे लग्न मुरादाची मुलगी दोस्तार बानू बेगम हिच्याशी लावण्यात आले. १६७६ मध्ये सुलतान महंमदचे निधन झाले.
शुजावरील मिळालेल्या विजयामुळे औरंगजेबाचा आत्मविश्वास वाढला होता. महिनाभर तयारी करून आता तो दाराशी शेवटची लढाई देण्यासाठी निघाला. अखेर देवराई येथे १४ मार्च रोजी दोन्ही सैन्यांची गाठ पडली. शुजा प्रकरणामुळे दुखावला गेलेला जसवंतसिंग दाराच्या मदतीला गेला नाही. देवराई येथे देखील दाराचा पराभव झाला व तो पुन्हा गुजरातच्या दिशेने पळू लागला. औरंगजेबाने जयसिंगाला दाराच्या मागावर सोडले. दाराने आता उत्तरेकडे कूच केले व बोलनखिंड ओलांडून पलीकडे पर्शियात जाण्याचा अप्रिय निर्णय नाईलाजाने घेतला. त्याचे सर्व साथीदार त्याला सोडून जाऊ लागले. अखेर तो अगदी भिकाऱ्यासारख्या वेशात आपल्या पत्नी व दोन मुलांसहित वणवण फिरू लागला. आत्यंतिक श्रमाने आजारी पडून वाटेत त्याच्या पत्नीचे निधन झाले. अखेर त्याला व त्याच्या मुलांना आश्रय देणाऱ्या एका अफगाणाची मती फिरली व बक्षिसाच्या लालसेने त्याने दाराला पकडून दिले. दाराला पकडून दिल्लीला पाठविण्यात आले. दाराची घटका भरली होती. आता त्याचे नशीब औरंगजेब ठरविणार होता. दाराने औरंगजेबाच्या दयाबुद्धीला आव्हान करणारे एक पत्र पाठवून हे राज्य आता तुझे आहे. मला मारण्याचा तुझा बेत अन्यायकारक आहे.” त्यावर औरंगजेबाने “तुझी कृत्ये माफ करण्याजोगी नाहीत. ही वेळ तूच आणली आहेस” असा उलटा निरोप पाठविला. समजा औरंगजेब दाराच्या हाती सापडला असता तर दाराने देखील त्याचे चार तुकडे करून दिल्लीच्या चौरस्त्यावर टाकायला कमी केले नसते.
३० ऑगस्ट १६५९ ची दिल्लीतील संध्याकाळ! औरंगजेब बागेमध्ये बसला होता. आदल्या दिवशी अपमानास्पद अवस्थेत चिखलाने माखलेल्या बोडख्या हत्तीणीवरून जाहीर धिंड काढत आणलेल्या दारा शुकोहला इस्लामच्या पथावरून ढळल्याची शिक्षा म्हणून मृत्युदंड देण्यात आला होता. त्याने पाठवलेली सात माणसे दाराचे शीर घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली. औरंगजेबाने ते रक्ताने माखलेले शीर एका थाळीत ठेवून त्याच्या चेहऱ्यावरचे रक्त साफ करण्याची आज्ञा दिली. महालातून दिवे मागवले आणि त्या प्रकाशात त्या मुंडक्याच्या कपाळावरील खुणा बघून ते मुंडके दाराचेच आहे याची खात्री करून घेतली. मग आपल्या जवळच्या कट्यारीने त्या मुंडक्याच्या कपाळावर तीन वेळा टोचले आणि आज्ञा केली याच्या धडाची पुन्हा एका उघड्याबोडख्या हत्तीवरून धिंड काढा आणि मग त्याचे धड आणि मुंडके हुमायूनच्या कबरीच्या परिसरात कुठल्याही विधींशिवाय दफन करून टाका. दाराच्या मृत्यूसहीत औरंगजेबाचा शेवटचा मोठा शत्रू संपला होता आणि औरंगजेबाची सत्ता स्थिर झाली होती.
संदर्भ –
१) हिस्टरी ऑफ औरंगजेब- सर जदुनाथ सरकार
२) द एम्परर हू नेव्हर वॉज- सुप्रिया गांधी
३) सिंध इन मुघल एम्पायर- अमित पालीवाल
४) मुसलमानी रियासत भाग २ – रियासतकार सरदेसाई
५) स्टोरिया डो मोगोर- निकोलाओ मनुची
६) औरंगजेब: शक्यता आणि शोकांतिका- रवींद्र गोडबोले
आपला लेख वाचून औरंगजेब बद्दल अधिक माहिती मिळाली. आपले लेखनकार्य असेच अविरत सुरू रहावे ही विनंती.
अप्रतिम