अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण, पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल!

पोलिसांकडून पुढील तपास सुरु

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण, पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल!

बेंगळुरूमध्ये एआय इंजिनिअरच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला आहे. ३४ वर्षीय अतुल सुभाषने त्याची पत्नी निकिता सिंघानिया आणि सासू निशा सिंघानिया यांच्यावर पैशांसाठी छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली. या प्रकरणात त्यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवर देखील आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी मराठाहल्ली पोलिसांकडून मृत अतुलच्या पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी अभियंत्याने ८० मिनिटांच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये आपला त्रास कथन करून ही बाब उघड केली. त्यांनी  आपल्या व्हिडिओ संदेशात एलोन मस्क आणि अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील टॅग केले आहे. याबाबत २४ पानी सूसाईड नोट सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सहन केलेला त्रास आणि आत्महत्येचे कारण सांगितले आहे.

हे ही वाचा : 

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार; आयईडी स्फोटात दोन जवान जखमी

दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळा!

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!

बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर

अतुल सुभाष यांनी आपल्या आत्महत्येसाठी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांसह पाच जणांवर आरोप केले आहेत. यामध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रिता कौशिक, अतुल सुभाष यांच्या पत्नी निकिता सिंघानिया, पत्नीचा भाऊ अनुराग सिंघानिया, पत्नीची आई निशा सिंघानिया, पत्नीचे काका सुशील सिंघानिया यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर अतुल सुभाष यांचे भाऊ विकास कुमार यांच्या तक्रारीवरून अतुलची पत्नी निकिता सिंघानियासह ४ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया, भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून अतुलने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

Exit mobile version