शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर सत्ताधारी नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. आधी सगळे लोक मातोश्रीवर येत होते. मात्र, आता उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन देखील भेटीसाठी तीन-तीन दिवस बसावं लागतंय. याच्यावरूणच उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या लेखी किंमत शून्य आहे हे स्पष्ट होते, असा टोला भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा, हितापेक्षा त्यांना मी आणि माझे कुटुंब हे प्रिय असल्याचे त्यांनी त्यांच्या दौऱ्यातून सिद्ध करून दाखवल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले.
अतुल भातखळकर ट्विटकरत म्हणाले की, जनाब उद्धव ठाकरेंना दिल्लीत जाऊनही सोनिया गांधींच्या भेटीकरिता तीन दिवस ताटकळत रहावे लागले. याच्यावरूणच उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या लेखी किंमत शून्य आहे हे स्पष्ट होते. राहुल गांधी भेटले तेही खर्गेंच्या घरी आणि तिकडे उद्धव ठाकरेंना क्रमांक तीनवर बसवून. कारण महाविकास आघाडीच्या निकालामध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आलेत तिसऱ्या नंबरवर आणि ते सुद्धा काँग्रेसच्या मतांवर. त्यामुळे मुख्यमंत्रीपद तर सोडाच आता मविआमध्ये १०० जागा तरी मला द्या, अशा प्रकारची याचना करण्याकरीता स्वतःला स्वाभिमानी म्हणवणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या चरणी त्या ठिकाणी गेल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले.
हे ही वाचा:
होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना ‘देवाचे कृत्य’; भावेश भिंडेचा दावा फेटाळला
‘बांगलादेशात कट्टरवाद्यांमुळे स्मशानभूमीही शिल्लक नाहीत’
‘महाराष्ट्रातील जनतेने उबाठाची लाचारी बघितली’
“सेलिब्रिटी असाल पण सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल”
ते पुढे म्हणाले, चरणदास उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न तर सोडाच १०० जागा मिळतील याचीही शाश्वती नाही. आम्ही एकत्रित जाहीरनामा काढू, जागा वाटप लवकर जाहीर करा, अशा प्रकारची भाषा ते करत आहेत. पण जाहीरनाम्यामध्ये ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे मुद्दे मांडणार की नाही, असा सवाल माझा त्यांना आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान करणाऱ्या, हिंदूंना दहशतवादी म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे ही सर्व भाषा करतायेत. त्यातला फोलपणा ओळखण्याइतकी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं आणि आपल्या दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हे एक लाचार नेते असल्याचे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा, हितापेक्षा त्यांना मी आणि माझे कुटुंब हे प्रिय असल्याचे त्यांनी त्यांच्या दौऱ्यातून सिद्ध करून दाखवले आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.
दिल्ली दरबारी जाऊन
भजन, पाद्यपूजन करून
चरणामृत घेऊन आले
पण कटोरा रिकामाच राहीला
अ रारा… pic.twitter.com/0e43xrjCTl— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 9, 2024