१७ दिवसांनी त्या कामगारांनी पाहिला प्रकाश

सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांची अखेर सुटका, मोदींनी केले कौतुक

१७ दिवसांनी त्या कामगारांनी पाहिला प्रकाश

अखेर १७ दिवसांनी त्यांना प्रकाश दिसला. उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्याच्या कामादरम्यान अडकलेले ४१ कामगार अखेर त्या मरणयातनांतून बाहेर आले, अगदी सुखरूप. गेल्या १७ दिवसांत विविध पद्धतीने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. अनेकवेळा अपयश आले मात्र अखेर त्यांना सगळ्यांना सुखरूप बाहेर आणण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी या कामगारांचे स्वागत केले. त्यांना पुष्पहार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. स्थानिकांनी कामगार बाहेर आल्यावर पेढे वाटून आनंद साजरा केला. एका कामगाराच्या नातेवाईकाने आपल्याला खूप आनंद झाल्याचे सांगितले.

१२ नोव्हेंबरला या बोगद्याचा काही हिस्सा कोसळला होता. त्यामुळे ४१ कामगार अडकले. त्यांना तिथून काढणे किती शक्य आहे, याविषयी चिंता वाटू लागली होती. त्यांच्यापर्यंत नंतर काही दिवसांनी खाण्याचे पदार्थ पाठवणे शक्य झाले. पाइपलाइन टाकून, त्या बोगद्याचा वरचा हिस्सा खणून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. अखेर हे सगळे कामगार बाहेर आले. बाहेर पडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे साश्रुनयनांनी स्वागत केले. बाहेर आल्यानंतर या कामगारांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यासाठी बोगद्याच्या बाहेरच्या बाजूला रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या होत्या.

 

संयम आणि जिद्दीचे पंतप्रधानांकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामगारांच्या सुटकेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान लिहितात की, मी या बोगद्यात अडकलेल्या माझ्या मित्रांना हे सांगू इच्छितो की, तुमचे धैर्य आणि संयम यामुळे तुम्ही बाहेर येऊ शकलात, ते सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अपेक्षा आहे की, तुमची प्रकृती उत्तम असेल. पण ही नक्कीच अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे की, बऱ्याच प्रतीक्षेनंतर माझे हे मित्र आपल्या प्रियजनांना भेटू शकले. पंतप्रधानांनी पुढे लिहिले आहे की, या संकटकाळात या कामगारांच्या कुटुंबियांनी जो संयम आणि जिद्द दाखवून दिली त्याचे पुरेसे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या बचावकार्याशी संबंधित सगळ्यांचा मी आभारी आहे. या कार्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाने मानवता आणि संघभावना यांचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की, १७ दिवसांच्या भयंकर अनुभवानंतर या कामगारांची सुटका झाली आहे. या कामगारांनी जो संयम आणि जिद्द दाखविली त्याला देश सलाम करतो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या कामगारांची सुटका झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या सगळ्या बचावकार्यात ज्या विविध संस्था सहभागी होत्या त्यांच्यातील उत्तम समन्वयामुळे हे शक्य झाल्याचेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन उत्साहात

ओलिस मुक्त होत नाहीत तोपर्यंत गळ्यात ‘डॉग टॅग’ घालणार!

समृद्धी महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत!

तू माझ्या पोटी जन्मलास हे माझे भाग्य

या कामगारांपैकी एक असलेला पश्चिम बंगालचा सौभिक पखिराने आपली आई लक्ष्मीशी फोनवरून बातचीत केली. बंगाली भाषेत आई आपल्या मुलाला फोनवरून विचारले की, तुझी वैद्यकीय तपासणी झाली का? तेव्हा तो म्हणाला की, होय आमची तपासणी झाली आता ते आम्हाला रुग्णालयात नेत आहेत. त्यानंतर आईने त्याला सुखरूप घरी ये असे म्हटले. आई म्हणाली की, देवाची तुझ्यावर कृपा आहे. तू एक विश्वविक्रम केला आहेस. तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्मला हे माझे भाग्य.

 

प्रत्येक कामगाराला १ लाखांची मदत

मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली की, या सगळ्या कामगारांना प्रत्येकी १ लाखांची मदत केली जाईल तसेच त्यांची वैद्यकीय तपासणीही सरकारच्या माध्यमातून केली जाईल. या बोगद्यात बाबा भोकनाग यांचे देऊळ बांधले जाईल. त्यांच्या आशीर्वादामुळे हे बचावकार्य सुरळीत पार पडले.

Exit mobile version