दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी सांगितल्यानंतर आज दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री पदासाठी आतिशी मार्लेना यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदासाठी आतिशी मार्लेना आणि कैलाश गहलोत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो आपच्या आमदारांनी एकमताने स्वीकारला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचा पुढील मंत्री कोण?, ही चर्चा आता आतिशी मार्लेना यांच्या नावाने संपली आहे.
मुख्यमंत्री पदासाठी अरविंद केजरीवाल यांच्या घरी आप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. मिळालेल्या माहितीनुसार, आतिशी मार्लेना २६ -२७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष विधानसभा अधिवेशनात शपथ घेतील. गेल्या आठवड्यात मद्य धोरण प्रकरणात जामीन मिळालेल्या केजरीवाल यांनी १५ सप्टेंबर रोजी दोन दिवसांत राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण?, याकडे सर्वांचे लक्ष होते. यामध्ये केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचे देखील नाव समोर आले होते.
हे ही वाचा :
अल्पसंख्यांकांवरून भारतावर टिपण्णी करण्यापूर्वी इराणने स्वतःचे रेकॉर्ड्स बघावेत
न्यूयॉर्कमध्ये समाजकंटकांकडून स्वामीनारायण मंदिर लक्ष्य
तिहेरी तलाक पद्धत सुरूच; छत्री ३०० रुपयांना आणली, बाथरूममध्ये पाणी ओतले नाही म्हणून तलाक!
मुंबईत गणपती विसर्जनासाठी २५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दरम्यान, दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जवळचे मानले जातात. दिल्ली मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री असण्याव्यतिरिक्त, त्या शिक्षण, वित्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल आणि सेवा यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचाही प्रभारी आहेत.