कोरोनामुळे क्रीडाक्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे हे खरे असले तरी त्याचा भार खेळाडूंवर टाकणे योग्य ठरेल का, असा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स असोसिएशनने नाशिक येथे राज्य निवड स्पर्धेचे आयोजन केले असून त्यासाठी इच्छुक सहभागी खेळाडूंकडून प्रत्येकी १०२५ रुपये आकारण्याचे ठरविले आहे. याआधी, ही रक्कम २०० रुपये होती, पण कोरोनामुळे ही रक्कम वाढविण्यात आली आहे. जवळपास पाच पट रक्कम वाढविण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत राज्य ऍथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचील यांनी ‘न्यूज डंका’ला सांगितले की, ‘हे शुल्क २०० रुपये होते, पण कोरोनामुळे त्यात वाढ करावी लागली आहे. जे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील त्यांचे पैसे आम्ही परत करणार आहोत. हा निर्णय कार्यकारिणीने ठरविल्याप्रमाणे झालेला आहे.’
एकूणच कोरोनामुळे राज्य संघटनेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे स्पर्धा प्रवेशशुल्काचा जादा भार हा मुलांवर पडत असल्याचे दिसते आहे.
नाशिक येथे होणाऱ्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून मुले सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रवासाचा स्वतंत्र भार पडणार आहेच. त्यात हे प्रवेश शुल्कही भरावे लागणार आहे. शिवाय, राज्य संघटनेच्या पत्रकात म्हटल्याप्रमाणे या मुलांचा तिथे राहण्याचा, खानपानाचा खर्चही त्या मुलांनाच उचलावा लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांवर मोठा आर्थिक भार येणार आहे.
कोरोनाच्या काळात जर संघटनेला आर्थिक फटका बसला असेल तर तेवढाच फटका खेळाडूंनाही बसला आहे. या परिस्थितीत त्यांनी पाचपट वाढलेले हे शुल्क कसे भरायचे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भात उचील म्हणाले की, ‘आम्ही २०० रुपये इतके शुल्क ठेवले तर अनेक मुले यात सहभागी होतील आणि त्याचे व्यवस्थापन कोरोनाच्या काळात करणे शक्य होणार नाही. त्यामुळे जे राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र होऊ शकतील त्यांच्यासाठी ही निवड स्पर्धा खुली असेल.’
हे ही वाचा:
काय आहे मोदी सरकारने आणलेली भारत सिरीज?
अमेरिकेने घेतला १३ जवानांचा बदला
अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे
…म्हणून सध्या चवदार तळे आहे चर्चेत
राष्ट्रीय स्पर्धा वारंगल येथे होणार आहे. त्यात महाराष्ट्रातून खेळाडू सहभागी होतील. या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, या निवड स्पर्धेसाठी कोणतेही पदक, प्रमाणपत्र, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.