किमान देवांना राजकारणापासून दूर ठेवा

तिरुपती प्रसाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

किमान देवांना राजकारणापासून दूर ठेवा

तिरुपती देवस्थानम मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या प्रकरणावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा असून या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार वायवी सुब्बा रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, तिरुपती मंदिरातील प्रसादाचा मुद्दा राजकीय वादाचा विषय बनल्याने सर्वोच्च न्ययालयाने खडेबोल सुनावले आहेत.

न्यायमूर्ती बी. के. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी आमचे मत आहे की, प्रकरणाचा तपास सुरू असताना उच्च घटनात्मक पदांवर असलेल्या लोकांनी विधाने करू नयेत. ज्याचा जनतेच्या भावनांवर परिणाम होतो. सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांची मदत मागितली आहे की राज्य सरकारची एसआयटी पुरेशी आहे की आणखी कोणी नव्याने तपास करावा? सर्वोच्च न्यायालयात आता ३ ऑक्टोबरला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या एसआयटीने या प्रकरणाचा तपास करायचा की नव्याने तपासाचे आदेश द्यायचे याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना निर्णायक पुराव्याशिवाय तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रसिद्ध लाडू तयार करण्यासाठी प्राण्यांच्या चरबीयुक्त भेसळयुक्त तूपाचा वापर केल्याचा आरोप जाहीर केल्याबद्दल विचारणा केली. तुम्ही स्वतःच चौकशीचे आदेश दिलेत तेव्हा पत्रकारांकडे जाण्याची काय गरज होती, असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने किमान देवांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, अशी टिप्पणी केली.

प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला असून न्यायालयाने यासंदर्भात सविस्तर टिप्पणी केली आहे. “प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये भेसळ असल्याचा निष्कर्ष ज्या अहवालाच्या आधारे काढण्यात आला आहे, त्या अहवालावरून असं स्पष्ट होत आहे की अहवालासाठीचे नमुने गोळा करण्यात आलेला तुपाचा साठा प्रसाद बनवण्यासाठी वापरलाच गेलेला नाही”, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

हे ही वाचा..

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर इडीकडून गुन्ह्याची शक्यता

राज्यात गायी राज्यामाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या महिन्याच्या सुरुवातीला वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात तिरुपती लाडू तयार करताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप केला होता , ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

Exit mobile version