… म्हणून आसाममध्ये जाळली गेंड्यांची शिंगे!

… म्हणून आसाममध्ये जाळली गेंड्यांची शिंगे!

जागतिक गेंडा दिनानिमित्त बुधवारी (२२ सप्टेंबर) आसाम सरकारने लोकांना असलेले गेंड्यांसंबंधितचे गैरसमज दूर करण्यासाठी २ हजार ४०० हून अधिक गेंड्याची शिंगे जाळली. जागतिक गेंडा दिनानिमित्त मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत वन आणि पर्यावरण मंत्री परिमल शुक्ल बैद्य आणि स्थानिक एजीपी आमदार आणि कृषी मंत्री अतुल बोरा यांच्या उपस्थितीत गेंड्यांच्या शिंगांचे विधीवत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानापासून २३ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बोकाखाट येथे सार्वजनिकरित्या दहन करण्यात आले.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, ही विशेष मोहिम धोक्यात आलेल्या एक शिंग असलेल्या भारतीय गेंड्याच्या शिकारीला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. ‘आम्ही जगाला एक सशक्त संदेश देऊ इच्छितो की डोक्यावर शिंग असलेला जिवंत गेंडा आमच्यासाठी मौल्यवान आहे, शिकारीमुळे मृत पावलेला किंवा सरकारी तिजोरीत ठेवलेला मृत प्राणी नाही,’ असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘ही’ असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार

किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये

जागतिक पातळीवर कोरोना रुग्णसंख्येत घट!

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

अनेक लोकांना गेंड्याच्या शिंगाबद्दल गैरसमज आहेत की, शिंगामध्ये औषधी गुण आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गेंड्याची शिकार केली जाते. नैसर्गिक किंवा अपघातामध्ये मरण पावलेल्या गेंड्यांचे, शिकाऱ्यांकडून किंवा कारवाई दरम्यान जप्त केलेले शिंग आणि वर्षानुवर्षे सरकारी तिजोरीत ठेवलेले असे २ हजार ४७९ शिंगांचे दहन करण्यात आले. ९४ शिंगे ही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील संग्रहालयात प्रदर्शित केली जातील आणि २९ शिंगे ही चालू असलेल्या न्यायालयीन कारवाईसाठी ठेवण्यात येतील.

शिकाऱ्यांनी मिळवलेल्या गेंड्यांची शिंगे बाहेरील अनेक देशात अनधिकृतपणे विकले जातात. व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये या शिंगांना मोठी मागणी असून तिथे त्यांना किंमतही चांगली मिळते. आसाममध्ये जगातील एक शिंगे गेंड्याची ७१ टक्के लोकसंख्या आहे. आसाममधील एक शिंगाच्या गेंड्यांची लोकसंख्या १९९९च्या गणनेनुसार १६७२ इतकी होती तर २०१८ च्या गणनेनुसार २६५२ आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी असेही सांगितले की भविष्यात नैसर्गिकरीत्या किंवा अपघातात मरण पावणाऱ्या गेंड्यांची शिंगे दरवर्षी जाळली जातील.

 

 

Exit mobile version