आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी पोलिस दलामध्ये मोठ्या बदलाचे संकेत देत रविवारी सुमारे ३०० आसाम पोलिस अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय जाहीर केला. मद्यपी पोलिस अधिकाऱ्यांमुळे पोलिस दलाची कार्यक्षमता कमी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आसामच्या गृहविभागाचा कार्यभारही मुख्यमंत्री सरमा यांच्याकडेच आहे.
जे पोलिस अधिकारी अति मद्यपान करतात, त्यांच्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. लोकांच्या अशा अधिकाऱ्यांविरोधात गंभीर तक्रारी आहेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे त्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगत रिक्त होणाऱ्या ३०० पदांसाठी लवकरच भरती केली जाईल, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘राज्याच्या गृह विभागातील सुमारे ३०० पोलिस अधिकाऱ्यांना मद्यपानाची सवय आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने अशा पोलिसांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा अति मद्यपान करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी या आधीच नियम आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला की, ते सरकारचे विकेंद्रीकरण करण्याचाही प्रयत्न करीत आहेत. त्यांनी एकेकाळी उपायुक्तांच्या कार्यालयाकडे असलेले अधिकार आणि जबाबदाऱ्यांच्या विक्रेंदीकरणासाठी राज्याच्या १२६ विधानसभा मतदारसंघांमध्ये उपायुक्त कार्यालये उघडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या सरकारी कामांसाठी जिल्हा मुख्यालयाकडे येण्याची आवश्यकता भासणार नाही. हे उपायुक्त कायदा आणि सुव्यवस्था बघतील आणि त्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील.
आसाम सरकार प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचा विचार करत आहे आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रशासकीय आणि आर्थिक केंद्रामध्ये रूपांतर करण्याच्या तयारीत आहे.
हे ही वाचा:
शंभरीतल्या आजींनी सांगितली ‘मन की बात’, ‘आमचा तुला आशिर्वाद .. सुखी रहा’
३८ लाखांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी धाडले यमसदनी
प्रतीक्षा संपली.. केबीसीच्या हॉट सीट समोर होणार ‘बिग बी’ची एंट्री
उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!
सरमा यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भाजप सरकारला मे महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल सुरू होतील. सुधारणेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा आयुक्तांसोबत तीन दिवसीय बैठक बोलावली आहे. १२ ते १४ मे दरम्यान तिनसुकिया जिल्ह्यात ही बैठक होणार आहे.