आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या तारखा अखेर जाहीर झाल्या. गुरुवारी यासंदर्भात आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
या पत्रकात आशियाई क्रिकेट परिषदेने म्हटले आहे की, संमिश्र पद्धतीने ही स्पर्धा खेळविली जाईल. याचा अर्थ एकाच देशात ही स्पर्धा होणार नाही. त्यातील चार सामने हे पाकिस्तानात होतील तर इतर नऊ सामने हे श्रीलंकेत खेळविले जातील. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ हे देश सहभागी होणार आहेत. आम्ही जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींना या स्पर्धेसाठी आमंत्रित करत आहोत.
या आशिया कपसाठी दोन गट पाडण्यात आले असून प्रत्येक गटातील दोन संघ सुपर फोर गटात खेळतील. त्यानंतर या चार संघांपैकी अव्वल दोन संघ अंतिम फेरीत झुंजतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांत तणाव असल्यामुळे भारताने पाकिस्तानातील सामन्यांना आपण जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले होते. त्यावर पाकिस्ताननेही भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. जर आशिया कप स्पर्धा दुसऱ्या देशात घेण्याचे ठरविण्यात आले तर वनडे वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याचा पाकिस्तानचा इरादा होता.
आता लाहोरमध्ये पाकिस्तानातील सामने होणार आहेत तर श्रीलंकेतील सामने कँडी आणि पल्लेकेल येथे होतील. या स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाल्यामुळे आता पाकिस्तान भारतातील वर्ल्डकपमध्ये खेळेल अशी शक्यता आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा भारतात होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होण्याची शक्यता आहे.
आयसीसीचे सीईओ जेफ अलार्डिस आणि कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी कराचीत जाऊन पाक बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांची भेट घेतली. पाकिस्तानात आशियाई कप क्रिकेट स्पर्धेचे चार सामने होत असल्यामुळे वर्ल्डकपमध्ये खेळण्याविषयी पाकिस्तानची कोणतीही अट नसेल हे स्पष्ट झाले आहे. भारत आणि पाकिस्तान जर एकत्र खेळले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर स्पर्धेला त्याचा फटका सहन करावा लागू शकतो.