जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले होते. शुक्रवारी हरिद्वारच्या हर की पौडी येथे त्यांच्या अस्थी विधीपूर्वक पूजा-अर्चनेनंतर गंगेत विसर्जित करण्यात आल्या.
अस्थी विसर्जनावेळी शहीदांचे वडील राजेश नरवाल, त्यांचे मामा आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. अस्थि गंगेत विसर्जित करताना विनयचे वडील राजेश नरवाल यांच्या अश्रुंचा बांध फुटला. पाण्यात उभे राहून ते नदीत या अस्थि विसर्जित करत होते तेव्हा त्यांना हुंदका फुटला. शेजारी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सावरले. या अस्थि विसर्जनासाठी माजी कॅबिनेट मंत्री मदन कौशिक आणि भाजप कार्यकर्ते देखील हर की पौडी येथे आले होते आणि त्यांनी शहीद विनय नरवाल यांना आदरांजली अर्पण केली. उपस्थित लोकांनी “शहीद विनय अमर रहें”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
अस्थी विसर्जनानंतर राजेश नरवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “माझा मुलगा शहीद झाला, पण देवाकडे प्रार्थना आहे की भविष्यात कोणत्याही घरात असे दु:ख येऊ नये. ते पुढे म्हणाले, भारत सरकारने ठोस पावले उचलावीत जेणेकरून अशा घटनांचा पुन्हा कधीही पुनरावृत्ती होऊ नये. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. नरवाल कुटुंबीयांनी या दु:खद प्रसंगी देशवासीयांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
लेफ्टनंट विनय नरवाल यांचे नुकतेच लग्न झाले होते, आणि ते पत्नीसोबत काश्मीरमध्ये सुट्टीवर गेले होते. त्यांची सध्याची पोस्टिंग कोची येथे होती आणि ते दोन वर्षांपूर्वीच नौदलात भरती झाले होते.
एक जवान बेटे की अर्थी को कंधा देना, उसकी चिता को अग्नि देना और फिर अस्थियों को अपने हाथों से गंगा में प्रवाहित करना…एक पिता के लिए इससे दुख भरा और क्या होगा?
पहलगाम आतंकी हमले में मारे गए नेवी अफसर विनय नरवाल की अस्थियां आज हरिद्वार गंगा में प्रवाहित की गईं। pic.twitter.com/aO7314X9Mj
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 25, 2025
२४ एप्रिल रोजी काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आणि राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी शहीदाच्या कुटुंबीयांना भेट दिली आणि संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी या जघन्य हल्ल्याच्या जबाबदार दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
दीपेंद्र हुड्डा म्हणाले, “ही घटना केवळ करनालसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी मोठा आघात आहे. विनय नरवाल यांनी आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या हत्येने प्रत्येक भारतीयाच्या आत्म्यावर आघात झाला आहे. कार्तिकेय शर्मा यांनीही या हल्ल्याला अमानवी आणि भ्याड म्हणत दोषींना शिक्षा होईपर्यंत सरकार थांबणार नाही, असे सांगितले.