असुद्दिन ओवेसींच्या रॅलीत ‘औरंगजेब’ अवतरला

समाजात पुन्हा अस्थिरता निर्माण करण्याचं 'षडयंत्र '

असुद्दिन ओवेसींच्या रॅलीत ‘औरंगजेब’ अवतरला

महाराष्ट्रात पुन्हा एकदा औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक वेळा औरंगजेबाची भलामण केल्याबद्दल संभाजीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अनेक जणांना अटक केली होती.

 

शनिवारी बुलढाण्यात ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असुद्दिन ओवेसी यांची रॅली होती. त्यावेळी औरंजेबाच्या नावाने घोषणा देण्याचा प्रकार घडला. काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीला फुले वाहून पाया पडल्याचे चित्र समोर आले होते. त्यावेळी महाराष्ट्रात एकच गदारोळ झाला. प्रकाश आंबेडकरांच्या या कृत्याला अनेक नेत्यांनी, समाजकंटकांनी विरोध दर्शविला होता तर अनेकांनी समर्थन देखील केले होते. हा मुद्दा शांत होत नाही तोपर्यंत आता ओवेसींच्या बुलढाणा रॅलीत ‘औरंगजेब अमर रहेचा नारा’ दिल्यानंतर नवा वाद निर्माण होत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

 

बुलढाणा येथे शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या रॅलीत असुद्दीन ओवेसी आपले भाषण करत होते, त्याचवेळी त्यांच्या रॅलीत आलेल्या समर्थकांनी ‘औरंगजेब अमर रहे’ आणि ‘जब तक सुरज चांद रहेगा, औरंगजेब तेरा नाम रहेगा’ अशा घोषणा दिल्या. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये व्हाट्सअप स्टेटस मुळे सुरू झालेला औरंगजेब वाद गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात जोरात दिसत आहे. कित्येक ठिकाणी दंगली झाल्या. अशा व्हाट्सअप स्टेटसमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एका पीडित मुस्लिम कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले होते.

 

बुलढाण्यात  या घोषणाबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. पोलीस म्हणाले ,असे व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत आम्ही त्याची चौकशी करत असल्याचे, बुलढाणा पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कायदेशीर मतही घेणार आहोत. आतापर्यंत कोणीही तक्रार केलेली नाही तक्रार आल्यानंतर कायदेशीर अभिप्रायाच्या आधारे कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

हे ही वाचा:

अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !

इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत

आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज

इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत  

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये काही दिवसांमध्ये अचानक औरंगजेबाच्या अवलादी पैदा झालेल्या आहेत. काही लोक औरंगजेबाचे फोटो दाखवत आहेत स्टेटस ठेवत आहेत. या अशा कारणांमुळे समाजामध्ये दुर्भावना निर्माण होत अशांतता निर्माण करण्याचं काम करत आहेत. प्रश्न असा निर्माण होतो की , एवढ्या कमी कालावधीत औरंगजेबाच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या. या कारस्थान पाठीमागे कोण आहे. याचा खरा मालक कोण आहे. याची आम्ही चौकशी करून त्याला शोधून काढू. जाणूनबुजून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम आणि महाराष्ट्राचं नाव खराब करण्याचं काम जे कोणी करत आहेत त्याला आम्ही शोधून काढू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात किंवा देशात कोणाच्याही अंगात औरंगजेबाचे रक्त वाहत नाही. मग अचानक उठलेले हे औरंगजेबाचे पुत्र कोण? या देशातील मुस्लिम हे त्याचे वंशज नाहीत… औरंगजेब येथे हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी आला होता. त्याच्या अत्याचाराच्या कहाण्या हजारो पानांच्या असू शकतात. त्यामुळे कोणताही देशभक्त मुस्लिम औरंगजेबाला मानू शकत नाही,” असे फडणवीस म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या मातीत औरंगजेबाचे वंशज पुन्हा डोके वर काढत आहेत.“बुलढाणा येथील असुदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणादरम्यान औरंगजेबाचा गौरव करत घोषणाबाजी करण्याचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करून दोषींना धडा शिकवण्याची कारवाई करावी. तत्पूर्वी, प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीसमोर नतमस्तक झाले. मात्र हिंदुत्वावर पोपटपंची करणारे उद्धव ठाकरे गप्प आहेत. आता किमान ओवेसींच्या सभेत ठाकरे या घोषणांचा निषेध करतील का? बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

किरीट सोमैया यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, बुलढाण्यात औरंगजेबाला हिरो बनवण्याची घोषणा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव ठाकरे, काँग्रेस पार्टी, प्रकाश आंबेडकरांची पार्टी, आणि ओवैसी यांची पार्टी मुस्लिम मतांसाठी आपण औरंगजेबाला हिरो बनवणार का?असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची कर्म भूमी, जन्मभूमी आहे. हे कदापि स्विकारणार नाही. अशा प्रकारच्या औरंगजेबाला हिरो बनवणाऱ्या प्रवृतीवर कारवाई होणार असल्याची माहिती, सोमैया यांनी व्हिडिओद्वारे दिली. बुलढाण्यातील पोलीस अधीक्षकांना पत्र लिहीत कारवाई करण्याची विनंती केली आहे. मात्र, ओवेसी यांनी रविवारी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात बोलतांना त्यांच्या बुलढाणा सभेत औरंगजेबाचा गौरव करणार्‍या अशा कोणत्याही घोषणा दिल्याचे नाकारले, तर काही स्थानिक माध्यम चॅनेलवर “खोट्या बातम्या” चालवल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version