१८ व्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित निवडून आलेल्या खासदारांचा दोन दिवसीय शपथ सोहळा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (२४ जून) लोकसभेच्या सदस्याची शपथ घेतल्यानंतर उर्वरित सर्व खासदार शपथ घेत आहेत. दरम्यान, हैदराबाद लोकसभेचे खासदार आणि एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर पॅलेस्टाईन समर्थक घोषणा दिल्या. त्यानंतर भाजपने याला कडाडून विरोध केला.
असदुद्दीन ओवेसी यांनी शपथघेतल्यानंतर जयभीम, जय मीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन.. तकबीर अल्लाह-हू-अकबर अशा घोषणा दिल्या. ओवेसी यांच्या घोषणेनंतर भाजपकडून विरोध करण्यात आला. भाजप नेते जी किशन रेड्डी यांनी विरोध करत रेकॉर्डमधून काढण्याची मागणी केली. दरम्यान, असदुद्दीन ओवेसी संसदेच्या बाहेर आल्यानंतर त्यांना प्रसार माध्यमांनी रोखले आणि पॅलेस्टाईन घोषणेवरून प्रश्न विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, कोण काय बोलले, काय नाही बोलले हे सर्व तुमच्या समोर आहे. मी फक्त जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन… असं म्हटलं आहे.. सगळे जण काय म्हणाले ते पण ऐका. हे विरोधात कसे आहे, घटनेतील तरतुदी दाखवा, असे ओवेसी म्हणाले.
हे ही वाचा:
केजरीवालांचा मुक्काम तिहारमध्येचं; जामीन देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द!
पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर
२०५० पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल!
रोहित शर्माने पादाक्रांत केली विक्रमांची शिखरे
ओवेसींच्या या घोषणाबाजीला भाजप नेते जी किशन रेड्डी यांनी विरोध केला. ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे, यासंदर्भात ओवेसी म्हणाले की, ते (जी किशन रेड्डी) विरोध करतात, हे त्यांचे काम आहे. आम्हाला जे म्हणायचे होते ते आम्ही बोललो. त्यांना खूश करण्यासाठी आम्ही कशाला काही पण बोलू, असे ओवेसी म्हणाले.
तर त्याचवेळी दुसरीकडे भाजप नेते जी किशन रेड्डी म्हणाले की, या देशाच्या संसदेत शपथ घेताना जय पॅलेस्टाईनचा नारा देणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. एकीकडे ते (ओवेसी) संविधानाबद्दल बोलतात आणि दुसरीकडे संविधानाच्या विरोधात घोषणा देतात. भारतात राहून पॅलेस्टाईनची गाणी गाणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. अशा घटनांमुळे या लोकांचा खरा चेहरा समोर येतो. लोकसभेत अशा घोषणा देणाऱ्यांना जनतेने ओळखावे अशी माझी विनंती असल्याचे त्यांनी सांगितले.