नवी मुंबईतील सिवूड येथे गॉस्पेल चर्चच्यावतीने बेकायदेशीरपणे चालू असलेल्या बाल आश्रमात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चर्चमधील धर्मोपदेशक गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्यानंतर अखेर भाजपा मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ यांच्या मागणीनुसार, हे चर्च पाडण्यात आले आहे.
यावर्षी ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्हा बाल संरक्षण युनिटने एका एनजीओसोबत या चर्चवर छापा टाकला होता. चर्चच्या आवारात ४५ अल्पवयीन मुले-मुली आढळून आली. सर्व अल्पवयीन मुलांना वायुवीजन नसलेल्या अंधाऱ्या आणि छोट्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. यासोबतच त्यांना शिळे अन्नही देण्यात आले. धर्मोपदेशकाने आपला विनयभंग केल्याचे तीन मुलींनी पोलिसांना सांगितले. या अल्पवयीन मुलांना ठाणे जिल्ह्यातील विविध बालगृहात पाठवण्यात आले. छाप्याच्या एका आठवड्यानंतर, चर्चच्या ५५ वर्षीय धर्मोपदेशकाला एनआरआय कोस्टल पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
हे ही वाचा :
अतिसुंदर; गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान
अजितदादांनी काढली ठाकरेंच्या बातचलाखीची हवा…
जेवणातून ‘आर्सेनिक’ आणि ‘थेलीयम’ देत घेतला नवरा, सासूचा जीव
पुढे चर्चच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. चर्च बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबई महापालिकेला कळवले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर तीन दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन नवी मुंबई पोलिस तसेच एनएमएमसी आयुक्तांची भेट घेऊन चर्चवर तातडीने कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार या बेकायदेशीर चर्चचे एनएमएमसीने पाडकाम सुरू केले आणि दुपारपर्यंत संपूर्ण बांधकाम पाडले. तसेच या चर्चवर यापूर्वी कारवाई न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.