मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्याप्रमाणे या अनुषंगाने सोलापूर येथील श्रीवैष्णव मारुती देवस्थानात राज्यातील पहिली ‘सामूहिक आरती’ मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिली.
सोलापूर येथील वैष्णव मारुती देवस्थान, जुने घरकुल या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि वैष्णव मारुती देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामूहिक आरती’ करण्यात आली. या वेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, वैष्णव मारुती देवस्थानचे अध्यक्ष भास्कर राऊळ, विश्वस्त दीपक परदेशी, नारायण दुभाषी, रामकृष्ण सुंचू, श्रीनिवास कोत्तायम, गणेश मंदिराचे अध्यक्ष वेणूगोपाल म्याना, चौडेश्वरी मंदिराचे पुजारी गोवर्धन म्याकल, पद्माशाली पुरोहित संघटनेचे सदस्य व्यंकटेश जिल्ला, परमेश्वरी देवस्थानचे पुजारी विठ्ठल पांढरे, हिंदुत्वनिष्ठ विजय इप्पाकायल, धन्यकुमार चिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विनोद रसाळ, हिंदु जनजागृती समितीचे संकेत पिसाळ, गौरीशंकर कलशेट्टी, धनंजय बोकडे आणि बालराज दोंतुल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
हे ही वाचा :
२४ आणि २५ डिसेंबरला श्री साई पालखी निवारा, निमगांव, शिर्डी येथे झालेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्रभरातून ८७५ हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते.
यात प्रामुख्याने मंदिरे, तसेच मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दर आठवड्यातून एकदा ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करणे, काशी आणि मथुरा तीर्थत्रक्षेत्रांचा खटला जदलगती न्यायालयात चालवावा; सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत; मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी; मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ होण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी; राज्यातील मंदिरांच्या पुजार्यांना प्रतिमाह मानधन देण्याचा निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्या ठरावांद्वारे सरकारकडे करण्यात आल्या होत्या. या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी मंदिर महासंघाचे घनवट यांनी केली आहे.