‘विश्वकर्मा योजनेतील कारागीर उद्योजक व्हावेत’

पंतप्रधान मोदी यांनी वर्ध्यात व्यक्त केली भावना

‘विश्वकर्मा योजनेतील कारागीर उद्योजक व्हावेत’

पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना आयडी कार्ड, प्रमाणपत्र, स्किल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अमरावती येथील पीएम मित्र पार्कचे ई-भूमिपूजन, १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभ देखील याप्रसंगी करण्यात आला. यावेळी राज्यपाल डॉ. सी पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारत सरकारकडून स्किल इंडिया मिशनच्या माध्यमातून कौशल्य विकासाला सशक्त केले जात आहे. आज तरुणांना बदलत्या गरजांनुसार कौशल्य पुरवले जात आहे. स्किल इंडियासारख्या अभियानामुळे भारताच्या कौशल्याला जगभरात ओळख मिळाली. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपारिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षांपासून असलेल्या पारंपारिक कौशल्याचा वापर, विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करायच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जातीजमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाची आहे.”

या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच सप्लाय चेनसारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून, त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना, राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे सांगितले. पीएम मित्र पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

हे ही वाचा : 

एफएटीएफने दहशतवाद विरोधी भारताच्या प्रयत्नांचे केले कौतुक, गंभीर धोक्याचा इशाराही दिला!

अरेच्चा! बघता बघता ट्रकला रस्त्याने गिळले

नितेश राणे यांचा किरीट सोमय्या करू नका!

‘बेस्ट’च्या कंडक्टरवर धावत्या बसमध्ये चाकूहल्ला, पैसे लुटले, मोबाईल हिसकावला!

विद्यार्थ्यांना पुस्तकातील अभ्यासाप्रमाणेच कौशल्य देखील आत्मसात करता यावे, या उद्देशाने महाराष्ट्रातील १००० कॉलेजमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याची घोषणा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. त्याप्रमाणे इच्छुक महाविद्यालयांकडून अर्ज मागवण्यात आले आणि त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. प्रतिवर्षी प्रत्येक केंद्रात १५ ते ४५ वयोगटातील १५० विद्यार्थी कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण घेतील. त्याचप्रमाणे राज्यातील १.५ लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. या कार्यक्रमासाठी एकूण ७ लाख विद्यार्थी ऑनलाईन जोडले गेले होते.

त्याचबरोबार सुरु झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या प्रथम टप्प्यात काही महिला स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून, त्यांना २५ लाखांपर्यंत विशेष अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या विजेत्या स्टार्टअप्समध्ये आर्ट आणि क्राफ्ट, कृषी, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य यासारख्या क्षेत्रातील महिला स्टार्टअप्सचा सहभाग आहे. या योजनेचा सध्या दुसरा टप्पा सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे अर्ज मागवले जात असून, जास्तीत जास्त महिला स्टार्टअप्सनी यात सहभागी व्हावे. या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे ५०० स्टार्टअप्सना १ लाख ते २५ लाखपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

Exit mobile version