गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमधील माउंट कुन शिखरावर हिमस्खलनामुळे तीन सैनिक बेपत्ता झाले होते. त्या घटनेनंतर तब्बल नऊ महिन्यांनी बेपत्ता असलेल्या तीन लष्करी जवानांचे मृतदेह सापडले आहेत. त्यावेळी ३८ जवानांना हिमस्खलनाचा तडाखा बसला होता. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर तीन जवान बेपत्ता होते. अखेर बेपत्ता असलेल्या जवानांचे मृतदेह सापडले आहेत.
हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (HAWS) चे उप कमांडंट ब्रिगेडियर एसएस शेखावत यांनी या शोधमोहिमेचे नेतृत्व केले. ब्रिगेडियर एसएस शेखावत हे अनुभवी गिर्यारोहक आहेत, त्यांनी तीनदा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यांनी हे मिशन त्यांच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक मिशन असल्याचे सांगितले. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार,ज्या लष्करी जवानांचे मृतदेह सापडले आहेत त्यांची नावे हवालदार रोहित कुमार, हवालदार ठाकूर बहादूर आले आणि नाईक गौतम राजवंशी आहेत.
हे ही वाचा:
शासकीय नोकरी मिळताच पत्नीने पतीला दिला डच्चू !
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल
‘रामसेतू’ मार्गाचे रहस्य उलगडणार, इस्रोने तयार केला समुद्राखालील नकाशा !
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार!
दरम्यान, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (HAWS) मधील ३८ सैन्याची तुकडी लडाखमधील माउंट कुनवर पोहोचण्यासाठी निघाली होती. १ ऑक्टोबर २०२३ रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती आणि सैन्याच्या तुकडीला १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत माउंट कुन गाठण्याची अपेक्षा होती. या मोहिमेत सैन्याला तेथील अत्यंत खराब हवामानाच्या आव्हानांचा सामना करावा लागला. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी फरियाबाद ग्लेशियरवर कॅम्प २ आणि कॅम्प ३ मधील १८,३०० फूट पेक्षा जास्त उंचीवर बर्फाच्या भिंतीवर दोरी लावत असताना अचानक हिमस्खलन झाले आणि संपूर्ण टीम बर्फाखाली दबली गेली.