केंद्र सरकारने रविवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना एक महिन्यासाठी मुदतवाढ दिली. जनरल पांडे २५ महिन्यांच्या कार्यकाळानंतर ३१ मे रोजी सेवेतून निवृत्त होणार होते.मंत्रिमंडळ नियुक्त समितीने जनरल मनोज पांडे यांच्या सेवाविस्तारास मान्यता दिली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सेना नियम १९५४ नियम १६ अ (४) अंतर्गत त्यांना मुदतवाढ दिली आहे.
एक महिन्याच्या कालावधीसाठी ही मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ते आता ३० जून २०२४पर्यंत पदावर कार्यरत राहणार आहेत. विशेष म्हणजे जनरल पांडे यांच्यानंतरचे दोन वरिष्ठ अधिकारीही जूनमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.जनरल पांडे डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त झाले. त्यांच्या ४० वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत, त्यांनी पूर्व आर्मी कमांडचे प्रमुख म्हणून काम केले. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम सारख्या राज्यांमध्ये पूर्वेकडील क्षेत्रात चीनच्या विरूद्ध संरक्षणाची जबाबदारी या पूर्व आर्मी कमांडवर आहे.
हे ही वाचा:
मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार
इस्रायलचा राफा शहरावरवर हवाई हल्ला; ३५ जणांचा मृत्यू
पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक
कोलकाता नाइट रायडर्सने जिंकले तिसरे आयपीएल विजेतेपद
एप्रिल २०२२ मध्ये १२ लाख जवानांचे बळ असलेल्या लष्कराची सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांनी लष्कराचे उप-प्रमुख पद भूषवले होते.यापूर्वी १९७०मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लष्करप्रमुख जनरल जी. जी. बेवूर यांचा सेवाकाळ एक वर्षाने वाढवण्यात आला होता. त्यानंतर आता जनरल मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.