अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे- खोत हिने तिच्या खो- खोच्या प्रवासावर तयार होत असणाऱ्या चित्रपटाचे सुरुवातीस मिळणारे मानधन खो- खो खेळाडूंसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मी गरीब कुटुंबातील. खो- खोमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे मला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. आता माझ्यावर तयार होत असलेल्या चित्रपटाचे सुरुवातीस मिळालेले मानधन खो- खो खेळाडूंसाठी देत आहे,’ असे सारिका हिने सांगितले.
अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका हिचा राज्य संघटनेने शुक्रवारी पुण्यामध्ये सत्कार केला. यावेळी सारिका हिला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. तसेच सारिकाचे मार्गदर्शक डॉ. चंद्रजित जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. तेव्हा सारिका हिने तिच्या खो- खोच्या प्रवासावर चित्रपट तयार होणार असून त्यातून सुरुवातीला मिळणारे मानधन महाराष्ट्र खो- खो संघटनेला देणार असल्याचे सांगितले. चित्रपटाची पटकथा तयार झाली असून त्यांनी मला एका लाखाची रक्कम दिली आहे. ही रक्कम मी खो- खोपटूंसाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द करत आहे, असे सारिकाने सांगितले.
हे ही वाचा:
चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी होणार राजकीय उड्डाण?
रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक
कोरोना योद्ध्यांना ठाकरे सरकार कधीपरदेश ‘सन्मान’ देणार?
‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!
खो- खो खेळत असताना अनेक समस्यांचा सामना सारिकाला करावा लागला होता. गरीब घरांमधील खेळाडूंना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची कल्पना आहे, आता राज्य संघटनेने या निधीतून गरीब खेळाडूंना किट उपलब्ध करून द्याव्यात, तसेच गरजू खेळाडूंना साहाय्य करावे, अशी अपेक्षा सारिकाने व्यक्त केली आहे.
खो- खो स्पर्धा बारामतीत घेण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. त्यांनी आमदार निधीतून आणि जिल्हा विकास नियोजन निधीतून खेळासाठी काही निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत.