जगात भारी, दीपिका कुमारी!

जगात भारी, दीपिका कुमारी!

तिरंदाजी विश्वचषकात भेदले सुवर्ण लक्ष्य

भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी हिने रविवार २७ जून रोजी तिरंदाजी विश्वचषकात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन तीन सुवर्ण पदके आपल्या नावावर केली आहेत. पॅरिस येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात दीपिकाने भारताचे प्रतिनिधित्व करताना वैय्यक्तिक रिकर्व्ह, सांघिक रिकर्व्ह आणि मिश्र दुहेरी रिकर्व्ह अशा तिनही प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे.

तिरंदाजी विश्वचषकाच्या महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम सामन्यात रशियाची तिरंदाज एलेना ओसीपोवा विरुद्ध भारताची तिरंदाज दीपिका कुमारी असा सामना रंगला. पण या सामन्यात ६-० अशा सरळ सेट्समध्ये रशियन तिरंदाज एलेना ओसीपोवा हिचा पराभव करत दीपिकाने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तिरंदाजी विश्वचषकातील हे दीपिकाचे चौथे वैय्यक्तिक सुवर्ण पदक आहे.

हे ही वाचा:

पुदुचेरीला मिळाली पहिली महिला मंत्री

‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’…वडेट्टीवार शिवसेनेवर गुरगुरले

शिक्षण विभागात रिक्त पदे भरणार कधी?

पंतप्रधान मोदींनी घेतली तिरंदाज प्रवीण जाधवची दखल

रविवारी दीपिकाने महिला सांघिक रिकर्व्ह प्रकारातही सुवर्ण पदक पटकावले असून तिच्या सोबत कोमलिका बारी आणि अंकिता भकत या सहभागाची झाल्या होत्या. तर मिश्र दुहेरी रिकर्व्ह प्रकारात दीपिकाने तिचा पती अतानू दास याच्या साथीने सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. या दांपत्याच्या कारकिर्दीतील त्यांनी एकत्र जिंकलेले हे पहिले सुवर्ण पदक आहे.

तिरंदाजी विश्वचषकातील वैयक्तिक महिला रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक पटकावल्यानंतर दीपिका कुमारी आता जगातील क्रमांक एकची महिला तिरंदाज ठरली आहे. तर या कामगिरीमुळे पुढल्या महिन्यात होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही ती थेट पात्र ठरली आहे. या आधी २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्येही दीपिका कुमारी जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असल्यामुळे पात्र ठरली होती.

 

Exit mobile version