कोकण रेल्वे आता बोरिवलीवरून सुटणार

चाकरमान्यांना मोदी सरकाचा दिलासा

कोकण रेल्वे आता बोरिवलीवरून सुटणार

मुंबईतील कोकणवासियांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे पार पडलेल्या कोकणवासीयांच्या मेळाव्यात सांगितला. मुंबई – नायगाव – जुचंद्र असा नवा बायपास मार्ग टाकून बोरिवली हे कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्यासाठी आणि वंदे भारत गाडी सुरू करण्यासाठीही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी नमूद केले.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांच्या प्रचारार्थ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे मुंबईत आले होते. यावेळी त्यांच्याकडे पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेले बोरिवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे, तसेच गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेमार्ग बोरिवलीपर्यंत जोडण्यात यावा आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्यात यावी, अशा तीन मागण्या करण्यात आल्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. तसेच या कामांसाठीच्या निधीचीही त्यांनी माहिती दिली. हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत आणण्यासाठी ८२६ कोटी रूपयांची तर नायगाव – जूचंद्र बायपाससाठी १७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर नेपाळकडून बंदी

इस्लामवादी हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडतात

पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष उफाळला; डूरंड लाईनवर तालिबान्यांचा हल्ला

“अप्रामाणिकपणा केला असेल तर फाशी द्या”

कोकणवासियांच्या या मेळाव्याला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, सर्वश्री योगेश सागर, सुनील राणे, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी, विजय गिरकर उपस्थित होते. आमदार अतुल भातखळकर यांनी रेल्वे मंत्रालय आणि मोदी सरकारला धन्यवाद देत अभिनंदन केले आहे. “पश्चिम उपनगरातल्या कोकणवासियांच्या सुखकर प्रवासाची सोय करणाऱ्या रेल्वे मंत्रालय आणि मोदी सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन,” अशी पोस्ट अतुल भातखळकर यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर केली आहे.

Exit mobile version