मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली दौऱ्यावर गेले होते. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नशील असतानाचं महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांना संविधानाचे पुस्तक आणि पुनर्वसनासाठी काही रक्कम देण्यात आली. प्रमुख नक्षलवाद्यांसह ११ जणांनी आत्मसमर्पण केल्याने ही मोठी घटना मानली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही या घटनेची दखल घेत महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये एक कोटींहून अधिक रकमेचे बक्षीस असलेल्या ११ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे निश्चितच ‘इज ऑफ लिव्हिंग’ला चालना मिळेल आणि या प्रदेशात आणखी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, असे सांगून पंतप्रधान मोदींनी स्थानिकांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी यांनी खास कौतुक करत यासाठी ट्वीट करत विशेष अभिनंदन केले आहे. “दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन,” असे ट्वीट नरेंद्र मोदींनी केले आहे.
दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष… https://t.co/IbDVZ4GO2v
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2025
बुधवारी महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये विमलाचंद्र सिडम उर्फ ताराक्काचा यांच्यासह तब्बल ११ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. गडचिरोली पोलीस मुख्यालयात आठ महिला आणि तीन पुरुषांसह ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांच्या डोक्यावर एकूण एक कोटींहून अधिक रक्कम होती. शिवाय, छत्तीसगड सरकारने त्यांच्यावर बक्षीसही जाहीर केले होते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन डिव्हिजन कमिटी सदस्य, एक डेप्युटी कमांडर आणि दोन एरिया कमिटी सदस्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, उत्तर गडचिरोली नक्षलद्यांपासून मुक्त झाली असून लवकरच दक्षिण गडचिरोली मुक्त होईल. आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्यांचे कंबर मोडण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या काळात नक्षलवाद महाराष्ट्रातून हद्दपार झालेला आणि संपलेला दिसेल. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी राज्याच्या सीमा उरलेल्या नाहीत, इतर राज्याच्या सीमा पार करून नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवू शकतो. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे यासाठी आभार.
हे ही वाचा :
बांगलादेश न्यायालयाने हिंदू साधू चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला!
सात महीने खदखदणारे मस्साजोग कांड, निर्णायक वळणावर…
क्रीडा विभागात २१ कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी गजाआड!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचाही शुभारंभ केला. या भागात पोहोचणारे मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. पहिल्यांदाच या भागात पक्क्या रस्त्याचे बांधकाम झाले, पहिल्यांदाच या भागात बससेवा सुरु झाली. या बससेवेच्या पहिल्या फेरीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी नक्षलवादाविरोधात लढताना जिवाची पर्वा न करणाऱ्या गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-६० जवानांशी संवाद साधला.