रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. संजय पांडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे आणि बराच काळ या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती न करण्यात आल्याने न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. दरम्यान, आता राज्य सरकारने रजनीश सेठ यांची नियुक्ती पोलीस महासंचालकपदी केली आहे.
पोलिस महासंचालक हे पद सर्वोच्च असून त्याच्या नियुक्तीची कायदेशीर प्रक्रिया असते. यानुसार राज्यातील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात. त्यातून अंतिम नावांची शिफारस महासंचालक पदासाठी केली जाते. त्यातून पूर्णवेळ महासंचालक नियुक्ती केली जाते.
कोण आहेत हे नवे महासंचालक?
रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. याशिवाय रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. मुंबईत २६/११ जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी एका फोर्स वन पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी सेठ या पथकाचे प्रमुख होते.
हे ही वाचा:
गायिका वैशाली भैसनेला जीवे मारण्याची धमकी
‘गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी व्हायला हवी’
भाजपाची गीतापठणाची मागणी; सपाचा विरोध
चन्नी यांच्या ‘भैय्या’ वादावर मनीष तिवारी ‘हे’ बोलले…
संजय पांडे एप्रिल २०२१ पासून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावी ही मागणी अनेक दिवसांपासून होती, अखेर आज रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.