स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने त्यांच्या विचारांवर कार्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक कायमच आपल्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांसाठी चर्चेत असते. संस्थेच्या अशाच विविध उपक्रमांपैकी एक म्हणजे शिखर सावरकर पुरस्कार. सावरकर स्मारकाने २०२१ च्या शिखर सावरकर पुरस्कारांसाठी इच्छुका व्यक्ती आणि संघटना यांच्याकडून अर्ज मागविले आहेत.
२०२१ हे शिखर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही गिर्यारोहणात राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः हिमालयीन विभागात अतुलनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ भारतीय दिग्गजांकरीता एक जीवनगौरव, सह्याद्री विभागात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट साहसी गिर्यारोहकाकरीता एक वैयक्तिक आणि सह्याद्री विभागातच उत्कृष्ट साहसाबरोबरच इतर पूरक कामासाठी एक सांघिक अर्थात् संस्थात्मक स्तरावर दिला जाणारा असे मिळून ऐकूण तीन पुरस्कार दिले जाणार आहेत.
हे ही वाचा:
सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक
महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु
भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करूनही का ट्रोल झाला फरहान अख्तर?
या पैकी जीवनगौरव पुरस्काराकरीता आवेदनपत्र मागविले जात नाही. तर स्मारकाच्या निवडसमितीमार्फत याबाबतचे संपूर्ण कामकाज पाहिले जाते. वैयक्तिक आणि सांघिक पुरस्कारांकरीता योग्य मार्गाने व योग्य कालमर्यादेत प्राप्त आवेदनपत्रांमधूनच संभाव्य पुरस्कारार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि आकर्षक धनराशी यांचा समावेश आहे. पुरस्कारांच्या संपूर्ण प्रक्रियेत निवडसमितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
२०१५ हे वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र आत्मार्पणाचे ५० वे वर्ष होते. साहसाशी असलेला त्यांचा अनन्यसाधारण असा घनिष्ठ संबंध लक्षात घेऊनच सावरकर स्मारकाने तेंव्हा एका राष्ट्राभिमानी हिमालयीन मोहिमेचे आयोजन केले होते. अशा भव्य आणि महत्वाकांक्षी मोहिमेकरीता ७ निष्णात गिर्यारोहकांची देशभरातून निवड करण्यात आली होती. तेव्हा अनेक अडचणींवर मात करत स्मारकाच्या या पथकाने २३ ऑगस्ट २०१५ या दिवशी हिमाचल प्रदेशात कर्चानाला परिसरातील एका अजिंक्य, अनामिक हिमशिखराला सर केले आणि त्याद्वारे स्वातंत्र्यवीरांना ५० व्या आत्मार्पण वर्षानिमित्त एक अविस्मरणीय साहसी मानवंदना दिली.
याच ऐतिहासिक मोहिमेत यशस्वीरीत्या सर झालेल्या त्यावेळच्या अनाघ्रात, अनामिक हिमशिखरास आज आपण शिखर सावरकर म्हणून ओळखले जाते. या पुरस्कारांसाठी साहसप्रिय व्यक्ती आणि मान्यवर संस्था यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, खालील वेबलिंकच्या आधारे संगणकीय आवेदनपत्रे ऑनलाईन भरुन ती त्याच पद्धतीने विनाविलंब आणि विहित मुदतीतच सादर करावयाची आहेत.
वेबलिंक खालीलप्रमाणे आहे.
१) संस्थांकरीता आवेदनपत्राची लिंक. :- https://bit.ly/37bRZRs
२) व्यक्तींकरीता आवेदनपत्राची लिंक :- https://bit.ly/2VmvEOK